‘कॉक्सिट’ च्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग
लातूर ः नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेली जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा येथील कॉक्सिट महाविद्यालयात शनिवारी (दि.२३) पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या १३० स्पर्धकांनी सहभाग नोंवदत संशोधनपर प्रयोगांचे सादरीकरण केले. यातील ३६ विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॉक्सिटच्या पाच विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी आविष्कार स्पर्धा घेण्यात येते. ही स्पर्धा जिल्हा पातळीवर होते, त्यातील निवडक संशोधनांची विद्यापीठ स्तरावर निवड होते. अशीच जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा शनिवारी (दि.२३) येथील कॉक्सिट महाविद्यालयात पार पडली. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील व उपाध्यक्ष एल. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यपीठाचे आयआयएल संचालक डॉ. एस. जे. वडेर, समन्वयक डॉ. आर. व्ही. क्षीरसागर, कॉक्सिटचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्रचाचार्य डी. आर. सोमवंशी, डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, प्रा. सुषमा मुंडे, अविष्कार स्पर्धेचे जिल्हा समन्वयक प्रा. ईश्वर पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. झुल्पे यांनी विद्यार्थ्यांना सादर केलेल्या संशोधनाचे उत्कृष्ट सादरीकरण करून पारितोषिके मिळविण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १३० विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनांचे सादरीकरण केले होते. त्यांच्या प्रयोगांचे परीक्षण एकूण १२ परीक्षकांच्यावतीने करण्यात आले. त्यातील ३६ संशोधन प्रयोगांची विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यात कॉक्सिटच्या फिरदोस शेख, शोभा नवमने, राजश्री शेळके, नीकिता मोरे, कांचन शेट्टी यांच्या संशोधन प्रयोगांचा समावेश आहे. फिरदोस शेख हिच्या संशोधन प्रयोगांना मागील दोन वर्षांपासून आंतरविद्यापीठीय स्पर्धेत पारितोषिके मिळत आहेत. यावर्षीही तिच्या संशोधनाला पारितोषिक मिळण्याची आशा आहे.
‘कॉक्सिट’ च्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग
