• Sat. May 3rd, 2025

लातूर जिल्हा ‘टीबी’मुक्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींना आवाहन

Byjantaadmin

Dec 21, 2023

लातूर जिल्हा ‘टीबी’मुक्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींना आवाहन

लातूर, दि. २१ (जिमाका) :  ‘क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किटसाठी औद्योगिक संस्था, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी केले आहे.टीबीमुक्त भारत करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबिवले जात आहेत. त्याअंतर्गत क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्याच्यावर औषधोपचार करण्यात येतात. क्षयरुग्णांना सर्व सरकारी दवाखान्यातून मोफत तपासणी व औषध उपचार दिले जाते. तसेच क्षयरुग्णांना उपचार कालावधीत शासनामार्फत दरमहा ५०० रुपये  पोषण आहारासाठी दिले जातात. जिल्ह्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून यामध्ये जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था, स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, कर्मचारी व अधिकारी  यांनी सहभाग नोंदवावा. या अंतर्गत क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये सकस आहार उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत एडीएम अॅग्री, राज प्रतिष्ठान, आधार फाउंडेशन, धनंवंतरी वैद्यकीय महाविद्यालय व तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागाने उपचारावर असणाऱ्या एकूण १ हजार ९४० क्षयरुग्णांपैकी आतापर्यंत ९०० क्षयरुग्णांना १ हजार ५२३ पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत १ हजार ४० क्षयरुग्णांना पोषण कीट देण्यसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, कर्मचारी व अधिकारी यानी सहभाग नोंदवून पोषण आहार किटचे वाटप करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ही क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असणे, ताप असणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर गाठ येणे आदि लक्षणे ही क्षयरोगाची ओळखली जातात. त्यामुळे कोणतेही लक्षण असले तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ला घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *