अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकमेकांचा समाचार घेतल्याने सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले. तसेच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला.
नेमकं काय घडलं?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आज एकमेकांच्या आमनेसामने आल्याचं दिसून आलं. शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यानंतर जयंत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सभागृह संपलं नाही. एक तर दहा दिवसांचे अधिवेशन केलं आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असं हे बरोबर नाही. त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचं अधिवेशन घ्या आणि चर्चा करा.
जयंत पाटलांच्य भाषणावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांशी चर्चा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, तुमच्यात आधी ठरवा की कोण आधी बोलायचं ते.
जयंत पाटलांवर अजित पवार भडकले
जयंत पाटलांच्या या टोल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. ते म्हणाले की, आमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. त्यामुळे कसं बोलायचं आम्हाला माहिती आहे. कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी उरला. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला होता, त्यावेळी विरोधी पक्षाला माहिती होतं की अधिवेशन आज संपणार आहे. त्यावेळी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं हे धंदे बंद करा
विदर्भाच्याबद्दल उत्तर आलंच पाहिजे यासाठी आम्ही ठरवलं. त्यासाठी प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम त्यांनी केलं. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत.