इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मुकूल वासनिक आणो मोहन प्रकाश यांचा यामध्ये समावेश आहे. मुकूल वासनिक यांना समितीचं संयोजक बनवण्यात आलेलं आहे.अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांना अशावेळी समितीमध्ये सहभागी केलंय जेव्हा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे. विधानसभा निकालानंतरच दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर भूमिका देण्यात येणार असल्याची चर्चा होती.
मंगळवारी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडीसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाचं आहे. त्यातच काँग्रेसने ही कमिटी गठीत केली आहे.दरम्यान, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईतील बैठकीमध्ये ममता बॅनर्जी रागाने निघून गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या पक्षाचं कुणी उपस्थित राहातं का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल हे या बैठकीला उपस्थित राहतील, असं सांगितलं जात आहे.