सोलापूर : सोलापूर शहर परिसरात नववधूने लग्नादिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सालेहा महिबूब शेख (वय २५, रा. ओम नम: शिवाय नगर, कुमठे गाव रोड, सोलापूर) असं नववधूचं नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रियकराने मित्रांना सोबत घेत भयंकर त्रास दिला असल्याची माहिती नववधूचे वडील महिबूब शेख यांनी दिली आहे. प्रियकराने मित्रांना सोबत घेत सालेहाचे लग्न तोडण्याची धमकी दिली होती. नववधू सालेहा शेख हिने विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देखील दिली होती. एकतर्फी प्रेम प्रकरणात त्रास होत असल्याची लेखी तक्रार दाखल केली होती. तीन संशयितांचे नावे देखील लेखी तक्रारीत नमूद केले होते.
रविवारी रात्री मोठ्या आनंदाने हळदी कार्य संपन्न झालं. मध्यरात्री पर्यंत हळदीचे कार्यक्रम संपले आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास नववधू सालेहा हिने टोकाचे पाऊल उचलले. नववधूला झोपेतून आई उठवण्यासाठी गेली असता मुलगी सालेहा ही घराच्या सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने लग्नादिवशीच आपली जीवनयात्रा संपवली.
सालेहा शेख हिने १५ डिसेंबर २०२३ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या नावे पत्र लिहिले होते. ”एकतर्फी प्रेम प्रकरणातून घराजवळील तरुण व त्याचे मित्र मला त्रास देत आहेत. माझ्या फोटोचा दुरुपयोग करून अश्लील फोटो तयार करून माझ्या नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत आहेत. माझे लग्न मोडण्याची धमकी देत आहेत. मला न्याय द्यावा, आणि धमकी देणाऱ्या तरुणांविरोधात कडक कारवाई करावी”, असे पत्र स्वतः सालेहाने लिहिले होते. दरम्यान, ते पत्र देखील समोर आले आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. संशयीत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत. नववधूचे वडील महिबूब शेख व इतर नातेवाईक शासकीय रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.