लातुरला मिळणार हक्काचं जिल्हा रुग्णालय सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे खाजगीकरण थांबणार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती
लातूर/प्रतिनिधी:लातूर येथे मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिले आहेत.याशिवाय लातूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरण थांबविण्याचा निर्णयही घेण्यात आला असून आता राज्य शासनामार्फतच हे रुग्णालय चालविले जाईल,अशी माहिती आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
‘माझं लातूर’ परिवाराच्या वतीने दि.२ ऑक्टोबर पासून सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे खाजगीकरण थांबविण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले होते.लातूरच्या हक्काचे व मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे,अशी मागणीही करण्यात आली होती. सरकारचा प्रतिनिधी म्हणून म्हणून आ. निलंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
या प्रश्नासंदर्भात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी आ. निलंगेकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार मंगळवार दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर येथे आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.आ. निलंगेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी लातूरला मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सुपर स्पेशालिटी रुग्णालय आता शासनच चालवेल. त्याचे खाजगीकरण होणार नाही,असे आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.त्यामुळे लातूरच्या हक्काचे जिल्हा ग्रामीण रुग्णालय लातूरकरांना लवकरच मिळणार असल्याची माहिती आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे खाजगीकरण होणार नसल्याने सामान्य जनतेला पूर्वीप्रमाणेच या रुग्णालयातून उपचार मिळणार असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले.
—