• Tue. Apr 29th, 2025

राजर्षी शाहू महाविद्यालयात सुरु केले दुर्मिळ झाडांचे वृक्षालय

Byjantaadmin

Nov 7, 2023

राजर्षी शाहू महाविद्यालयात सुरु केले दुर्मिळ झाडांचे वृक्षालय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते झाले उदघाटन

 

लातूर दि.7 ( जिमाका ) ज्या ठिकाणी ग्रंथ असतात ते ग्रंथालय . त्या ग्रंथालयात आपल्याला ग्रंथसूची पाहून पुस्तकाची ओळख होते अगदी तसेच विद्यार्थ्यांना झाडांची ओळख व्हावी,झाडांचे औषधी महत्व तसेच पर्यावरणातील महत्व कळावे यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या अभिनव वृक्षालयाचे उदघाटन करण्यात आले.

देवराई फॉउंडेशन, थेऊर-पुणे यांच्या वतीने शाळा-महाविद्यालयात देशी आणि दुर्मिळ प्रजातीची 100 प्रकारची रोपे कुंड्यात लावून माहितीपत्रकासह ठेवण्यात येतात. ही ठेवलेली रोपे विद्यार्थी जतन करतील, रोज पाहतील आणि त्यातून त्यांना झाडांची ओळख तसेच माहितीही होईल. याचाच एक भाग म्हणून लातुर मध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयात वृक्षालय ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात आज महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वृक्ष प्रतिष्ठान,लातूर यांच्या सदस्यांनी पिशवीत असलेली 100 रोपे कुंडीत लावून केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही अत्यंत अभिनव संकल्पना असल्यामुळे वेळातला वेळ काढून प्रोत्साहन दिले. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड चळवळ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दुर्मिळ वृक्षारोपण, दुर्मिळ बीज बँक असे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे राजश्री शाहू महाविद्यालय हा पॅटर्न आहे, आता या दुर्मिळ वृक्षालय युवकांमध्ये पर्यावरणीय महत्व, दुर्मिळ वृक्षाचे त्यातील महत्व, परिस्थितीकी याचे महत्व कळण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल  इतर महाविद्यालयांनीही वृक्षालय ही संकल्पना राबवावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव गव्हाणे,नगर विकास प्रशासन विभागाचे सहआयुक्त रामदास कोकरे, वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

वृक्षालयात असलेली दुर्मिळ वृक्षजाती

या वृक्षालयात बिजा , बिबवा ,घटबोर ,दालमारा ,जुई ,माया ळू , शेंदरी ,करमळ  ,जसवंद ,बहावा ,रोहितक ,मोई ,कुचपांगऱा ,रामफळ ,महारुख ,करवंद ,ताम्हण ,शिंदी ,कोकम,गेळा ,काळा कुडा ,उंबर ,करंज ,खडशिंगी ,कवठ ,कुसुम्ब,मेड शिंगी ,शिरीष ,काळा पळस    तिवस ,जाई ,घंटीफूल कपबशी ,मुचकुंद ,जंगली बदाम ,बांबू ,आईन ,कडुलिंब ,अडुळसा ,हिरडा ,डाळिंब ,पिंपळ ,शिवण ,कृष्ण कमळ ,पारोसा पिंपळ ,पायर  पुत्रजीवा ,आंबा ,रतनगुंज ,रिठा ,पिवळा कांचन ,पळस, शमी, शेवगा, करदळ, गोकर्ण, रोहितक, मोगरा, कदंब, काटेसावर, सप्तपर्णी, आपटा, शिसव, आवळा, अर्जुन, कन्हेर, बेहडा, पारिजातक, कवठ,हिंगणबेट, आसाना, दहीपळस, भेरा, टेटू, मासरोहिणी, सुरंगी, भोकर, किन्हाई, घोळ, अनंत, रायआवळा, शेर, कामिनी, रानजाई, कांचन, दक्षिण मोह, तांबूट, अग्निमंथ, फणस, अंबाडा, वारस, उंडी, रक्तवल्ली, पिंपळी, रोहितक, अमली, वायवर्ण, वड, भोरसाल, वावळ, पांढरा कुडा, सीता अशोक, कौशि, रामवड,डिकेमाली , कण्हेर , खैर इत्यादी दुर्मिळ वृक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed