बीड: मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये झालेल्या दंगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर जाळण्यात आलं होतं. आता त्याच जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरीकरण्याचा निर्णय रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोन युवा आमदारांनी घेतला आहे. सोबत या दोघांचे परिवारही असणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये हिंसाचार झाला होता. त्यामध्ये एका जमावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर आणि कार्यालय पेटवून दिलं होतं. तसेच बीडमधील राष्ट्रवादीचे कार्यालयही पेटवण्यात आलं होतं. आता याच पेटवलेल्या कार्यालयात आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाने तो हल्ला केला नाही
रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील पेटवलेल्या कार्यालयात दिवाळी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावेल अशी चर्चा आहे. आपल्या घरावर हल्ला झाला तेव्हा सर्व कुटुंब घरातच होतं, हल्ला मराठा समाजानं किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, याबाबत योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी या आधीच जाहीर केलं आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट
“30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.”, असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. “मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल.”, असं संदीप क्षीरसागर फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत. “मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारनं या बाबतीत तातडीनं योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.”, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.