महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी काल, ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून बऱ्याच ठिकाणचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात आपणच नंबर वन असल्याचा दावा भाजपनं केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा दावा फेटाळला आहे. ‘भाजपनं जिंकलेल्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी, म्हणजे गाववालेच येऊन त्यांना मारतील, अशी खोचक टीका पटोले यांनी केली आहे.ग्रामपंचायत निकालांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘ग्रामपंचायतीसाठी काल ज्या निवडणुका झाल्या, त्यातल्या गडचिरोली आणि गोंदियाची मतमोजणी उद्या आहे. २,३२० ठिकाणची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत त्यातल्या ५८९ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसच्या विचारांचे उमेदवार निवडून आले आहेत. १३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं १,३१२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.भाजपच्या नंबर वनच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली. ‘भाजप हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोलून ते केंद्रात, राज्यात सत्तेत आले. कुठल्याही पक्षचिन्हाशिवाय ज्या निवडणुकात होतात, त्याचे निकाल लागल्यानंतर भाजपवाले खोटा प्रचार करतात. मागच्या काळात बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या, त्यात सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या. पण भाजपनं आपल्या आयटी सेलच्या माध्यमातून भ्रम पसरवला आणि मीडियातही तेच दाखवलं गेलं, याची आठवण पटोले यांनी दिली.
‘ग्रामीण भागात भाजपची अवस्था फारच भयानक आहे. शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारीचा फटका ग्रामीण भागात त्यांना बसला आहे. भाजपचा गड मानला जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात त्यांचा सुपडासाफ झालाय. असं असताना ते माझ्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत, असं पटोले म्हणाले.
‘विजयाचा दावा करणाऱ्या भाजपनं ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी. गाववालेच त्यांना येऊन मारतील. हा खोटा प्रचार करून भाजपचा काही फायदा होणार नाही आणि एवढा आत्मविश्वास असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात. त्यांना कुणी थांबवलं आहे. मीडियानं त्यांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पटोले यांनी केलं.पश्चिम महाराष्ट्रातही सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात काँग्रेस पुढं आहे. भाजपचा प्रचार धादांत खोटा आहे. आकडेवारी सांगण्यात ते एक्सपर्ट आहेत, पण वस्तुस्थिती ती नाही, असं ते म्हणाले.
मोहाडीची आकडेवारीच जाहीर केली!
मोहाडी ग्रामपंचायतीच्या निकालाची आकडेवारीच पटोले यांनी यावेळी जाहीर केली. मोहाडी तालुक्यात काँग्रेस २३, राष्ट्रवादी ७, बीआरएस ७ आणि ७ शरद पवार गट आणि भाजपचे २ आलेत. ही वस्तुस्थिती आहे आणि भाजप नेमका उलटा प्रचार करत आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.