महाराष्ट्रात सरसकट मराठा समाजाला ‘कुणबी’ प्रमाणपत्र देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेविरुद्ध खुद्द राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच दंड थोपटले आहे. मूळ ओबीसी जातींनी आता गप्प बसू नये. सरकारच्या या आदेशाविरुद्ध आवाज उठवावा असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील मूळ ओबीसी समाजाने जनतेसमोर आपला आक्रोश व्यक्त केला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. ‘सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. अशामुळं मूळ ओबीसी जातींचं आरक्षण संपून जाणार. आम्ही सुद्धा माणसं आहोत. आमचेही काही अधिकार आहेत. आम्ही काही बोललो तर धमक्या दिल्या जातात. आमच्या जीवावर उठणाऱ्या शक्ती कोण आहेत त्यांना शोधून काढण्याची जबाबदारी शासनाची आहे. मराठा आंदोलनात झालेल्या जाळपोळीमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. ज्यांची घरं जाळली त्यांना सुद्धा शासनाने भरघोस नुकसान भरपाई दिली पाहिजे.’ अशी मागणी भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भुजबळ यांनी यावेळी टीका केली. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी उपोषण स्थळी जाऊन न्यायाधीश त्यांच्या पाया पडतात, असा आरोप भुजबळ यांनी केला. न्यायाधीश जरांगे पाटील यांना ‘सर, सर’ म्हणत होते. अशा न्यायाधीशांकडून आमच्या काय अपेक्षा असणार’ अशी टीका त्यांनी केली.
आंदोलकांवरील गुन्हे माफ करण्याची जरांगेंकडून मागणी का?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जाळपोळ करणारी आमची माणसं नाहीत. जाळपोळ सरकारी माणसांनी केली, असं जरांगे पाटील म्हणाले होते. असं असेल तर आंदोलकांवरील गु्न्हे मागे घ्या, असं ते का बोलताएत, असा सवाल भुजबळांनी केला. आंदोलनादरम्यान जाळपोळ करणारे सर्वच जण ओबीसी समाजाची माणसं नव्हती. मराठा समाज हा समजदार समाजत आहे. अनेक वर्ष तो समाज राज्यकर्ता होता. अनेक मुख्यमंत्री या समाजातून झाले. अशाप्रकारे हल्ले करणारे मराठा समझदार लोक नाहीत, असं भुजबळ म्हणाले.
काही ठिकाणी मराठा आंदोलकांकडून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सुद्धा तोडफोड करण्यात आल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. एकीकडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे हे असं करायचं, अशी टीका भुजबळांनी केली.
राज्यात जातगणना कराः भुजबळ
राज्यात ओबीसींची संख्या मोठी आहे. राज्यात जातगणना करून नेमका कोणत्या जातीचा किती टक्का आहे, याची आकडेवारी समोर आणणे गरजेचे असल्याचं भुजबळ म्हणाले. जातगणनेची मागणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने सुद्धा केली असल्याचं ते म्हणाले. ‘मी माळी समाज असो की इतर कुठल्या जातीचं प्रतिनिधीत्व करत नाही. मी ओबीसी अंतर्गत येणाऱ्या ३७५ जातींचं प्रतिनिधीत्व करतो. महाराष्ट्रात काही लोकांच्या मनात भ्रम आहे. महाराष्ट्रात ओबीसी ५४ टक्क्याच्या खाली जाणंच शक्य नाही. बिहारमध्ये जातगणना केल्यानंतर तेथे ६३ टक्के ओबीसी आढळून आले.’ असं भुजबळ म्हणाले.