नागपूर : राज्यात झालेल्या २९५० ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने सर्वाधिक जागा काबीज केल्या आहेत. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. राज्याच्या उपराजधानीत झालेल्या निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गावातच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने त्यांना धापेवाडा गावात जोरदार टक्कर दिली असून त्यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत हिसकावली आहे. तसेच १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर कब्जा करत जिल्ह्यात काँग्रेसने जोरदार यश मिळवलं. भाजपने सहा ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकावली.
नागपूरच्या १२ तालुक्यांतील ३५७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. या कालावधीत, ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी त्यांच्या मताधिकाराचा वापर केला. यामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या धापेवाडा गावाचाही समावेश होता. इथे कोण बाजी मारते, याकडे सगळ्या जिल्हावासियांचं लक्ष होतं.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सरपंचपदासाठी भाजप आणि काँग्रेस समर्थित गटातील प्रत्येकी ५ उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात भाजपचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसचे नेते सुरेश भोयर यांना अंशत: यश आले आहे. भाजप समर्थित गटाचे कादीर इमाम हे छवारे तालुक्यातील बाभूळखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले तर वारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदी काँग्रेस समर्थित रत्ना अजबराव उईके विजयी झाल्या आहेत. कवठा ग्रामपंचायत येथील सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे नीलेश श्रीधर डुफरे हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.