राज्यभर ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाची लगबग आहे. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात मतदार राजाने एकाच प्रभागात नवरा-बायकोला मतरुपी आशीर्वाद देत त्यांना गुलाल उधळण्याची संधी दिली. संजय जाधव आणि त्यांची पत्नी सुनीता संजय जाधव अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. विजयानंतर त्यांनी फिरंगाई मातेचं दर्शन घेऊन गावकऱ्यांसोबत जल्लोष केला.
एकाच प्रभागातून नवरा बायको विजयी
प्रभाग क्रमांक पाचमधून संजय जाधव आणि सुनीता संजय जाधव ही नवरा बायकोची जोडी विजयी झाली. जोडीनेच फॉर्म भरून त्यांनी मतदारांकडे मतरुपी आशीर्वाद मागितले होते. जनतेने त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना विजयी केलं.सुनीता संजय जाधव, कविता विजय जाधव, वंदना सूर्यकांत भागवत (सर्वसाधारण स्त्री) संजय जयसिंग जाधव, सचिन श्रीरंग साळुंके (सर्वसाधारण) असे सगळे उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी जाधव पती पत्नी आणि वंदना भागवत यांनी गावकऱ्यांच्या साक्षीने विजयाचा गुलाल उधळला. या अभूतपूर्व विजयानंतर जाधव दाम्पत्याने कुरकुंभच्या फिरंगाई मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या समर्थकांसह जोरदार जल्लोष केला. पुणे जिल्ह्यातील नवरा-बायकोच्या भन्नाट विजयाच्या कहाणीची जोरदार चर्चा होतीये.