• Tue. Apr 29th, 2025

लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील 24 बेवारस वाहनांचा शुक्रवारी लिलाव

Byjantaadmin

Nov 6, 2023

लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील 24 बेवारस वाहनांचा शुक्रवारी लिलाव

लातूर दि. 6 (जिमाका) : एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील 24 बेवारस वाहनांचा भंगार भावाप्रमाणे जाहीर लिलाव 17 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या या लिलावात सहभागी होण्यासाठी खरेदीदारांनी 16 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा भरणा करून टोकन प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

जाहीर लिलाव करण्यात येणाऱ्या 24 बेवारस वाहनांमध्ये 19 तीन चाकी, 3 चार चाकी आणि 2 सहा चाकी वाहनांचा समावेश आहे. या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी खरेदीदारांनी 50 हजार रुपये अनामत रक्कम भरल्यानंतर टोकन प्राप्त करून घ्यावे. टोकन प्राप्त करून घेणाऱ्या खरेदीदारांनाच लिलावात बोली लावता येईल.

लिलावात अंतिम बोली लावून वाहन खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना त्याच दिवशी 25 टक्के रक्कम (अनामत रक्कमेसह) रोखीने भरावी लागेल. तसेच बोलीची पूर्ण रक्कम (अनामत रकमेसह) 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस स्टेशनला जमा करून वाहने घेवून जावी लागतील. लिलावात विक्री केली जाणारी वाहने भंगार म्हणून विक्री केली जाणार असल्याने त्यांची नोंदणी रद्द होणार आहे. त्यामुळे ही वाहने परत वापरता येणार नाहीत किंवा आहे तशीच विक्री करता येणार नाहीत. असे आढळून आल्यास संबंधित खरेदीदारास जबाबदार धरून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. लिलावात बोलीमध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लिलाव रद्द करण्याचा किंवा दुसऱ्या दिनांकास करण्याचा अधिकार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना राहील, असे एमआयडीसी पोलीस स्टेशनमार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed