MP राज्यात होत असलेल्या विधानसभा निमित्तानं गोंदिया येथं असलेल्या बिरसी विमानतळावर पंतप्रधान MODI यांचं रविवारी (ता. ५) आगमन झालं. सुरक्षेच्या कारणांमुळं या दौऱ्याबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. फारच मोजक्या लोकांना या दौऱ्याबाबत माहिती देण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी दहा वाजता विशेष विमानानं गोंदिया येथील बिरसी विमानतळावर पोहोचले. या वेळी भाजपचे खासदार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष र खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं.
मध्य प्रदेशातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी गोंदियातील बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील मेंढे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी या वेळी सर्वप्रथम खासदार मेंढे यांच्याशी ‘वन टू वन’ संवाद साधला. त्यानंतर ते खासदार पटेल यांच्याकडं वळले. खासदार पटेल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या तीनही नेत्यांनी काही मिनिटांपर्यंत आपसात चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा शिवणीकडं रवाना झाला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत जिल्ह्यात केवळ दोनच खासदार व काही मोजक्याच अधिकाऱ्यांना माहिती होती. शिवणीतील सभा आटोपल्यानंतरही खासदार प्रफुल्ल पटेलना घेऊन विशेष विमान बिरसीहून दिल्लीकडं रवाना झालं. भाजपचे अन्य नेते या दौऱ्याबद्दल अनभिज्ञ होते. पंतप्रधान कार्यालयाकडूनच तशा सूचना होत्या, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळं पंतप्रधानांनी खासदार सुनील मेंढे व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी नेमका काय संवाद साधला, याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलंय.पंतप्रधानांचा दौरा असल्यानं गोंदिया शेजारी असलेल्या भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. श्वान पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक, अशी विशेष पथकं बिरसी ते शिवणी मार्गावर तैनात होती. गोंदिया जिल्हा नक्षलवादांचा ‘रेस्ट झोन’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळं पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा दलांनी विशेष काळजी घेतली. गेल्या चार दिवसांपासून या भागामध्ये सुरक्षा दल नजर ठेऊन होते. सलग तीन दिवस पोलिसांच्या मदतीनं या भागात पथकांची ‘मॉकड्रिल’ सुरू होती.