• Wed. Apr 30th, 2025

स्पीकर बॉक्समधून व्हायची ड्रग्ज तस्करी? आणखी एका गोदामाचा पर्दाफाश,

Byjantaadmin

Nov 5, 2023

नाशिक पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा छापा मारून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करण्याच्या साहित्याचे गोदाम उद्ध्वस्त केल्यानंतर तस्करीसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरात तयार होणाऱ्या ‘एमडी’ची स्पीकर बॉक्समध्ये भरून तस्करी व्हायची. हा माल संशयित सनी पगारेपर्यंत पोहचल्यावर तो नाशिकमध्ये विक्री करायचा. त्यानुसार पोलिसांनी दोन मोठे स्पीकर्सचे बॉक्स व ‘एमडी’चा चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

solapur drugs2

सनीच्या घरातही स्पीकर्स

सोलापुरात सनीच्या सांगण्यावरून मनोहर काळे याने वीस हजार रुपये दरमहा नफ्यासाठी कारखान्याचा कायदेशीर करार केला होता. त्यानंतर वैजनाथ सुरेश हावळे (वय २७) याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. त्यानुसार पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा धाड टाकली. दरम्यान, नाशिकमध्ये तपास सुरू असताना सनीच्या घरातही पोलिसांना काही स्पीकर्स मिळाले होते. त्यात काही एमडी होते. तेव्हाच पोलिसांना स्पीकर्सच्या माध्यमातून तस्करी सुरू असल्याचा संशय आला. त्याद्वारे पथके पुढील तपास करीत होती. अजून एका मुख्य सूत्रधाराच्या मागावर पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणातील गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे हे संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत.

आतापर्यंतचा घटनाक्रम

– नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल सामनगाव येथील १२.५ ग्रॅम एमडीच्या गुन्ह्यात आठ संशयितांना अटक.
– त्याद्वारे संशयित सनी पगारे साथीदारांमार्फत सोलापुरातल्या मोहोळ एमआयडीसीत कारखाना चालवित असल्याचे उघड.
– २७ ऑक्टोबर रोजी कारखान्यात धाड टाकून दहा कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक.
– पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांना सखोल तपासाचे निर्देश.
– त्यानुसार गुन्हे शोध एक पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनडीपीएस) सहायक निरीक्षक हेमंत नागरे पथकासह सोलापुरात.
– शुक्रवारी (दि. ४) गोदामाजवळ सापळा रचण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याअन्वये, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हेमंत फड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे यांसह अंमलदार चंद्रकांत बागडे, अनिरुद्ध येवले, अप्पा पानवळ, राजू राठोड यांनी सापळा रचला.
– शनिवारी (दि. ५) नाशिक पोलिसांनी शहरात येऊन पुढील तपास सुरू केला आहे.

गोदामातील मुद्देमाल : ४० लाख
रासायनिक द्रव्य : ५ ड्रम

क्रूड पावडर : १७५ किलो

ड्रायर मशिन : १
स्पीकर बॉक्स : २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed