विशाल गिरी ॲक्टींग स्कूलच्या वतीने आयोजित
किड्स फॅशन शो ला लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : येथील विशाल गिरी ॲक्टींग स्कूलच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या किड्स फॅशन शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यंत कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या शोमध्ये मुलांसोबतच त्यांच्या मातांचाही लक्षणीय सहभाग मिळाल्याने हा शो उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून गेला.
या कार्यक्रमास लातूर शहर मनपाचे माजी सदस्य शैलेश गोजमगुंडे, मनसेच्या लातूर शहर महिला जिल्हाध्यक्षा प्रितीताई भगत , विशाल गिरी ॲक्टींग स्कूलचे संचालक सिनेदिग्दर्शक विशाल गिरी, सुनंदा तूगावकर,राहुल बंडगर, अर्चना सूर्यवंशी, सरोज डिग्रसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. लहान मुलांच्या या फॅशन शोमध्ये वय वर्ष ४ ते ६ वयोगटात रुद्र राहुल बंडगर याने प्रथम तर वैदेही सूर्यवंशी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. वय ७ ते १२ वर्ष वयोगटात शौर्या बनसोडे हिने प्रथम तर युक्ता पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला. या लहान बालकांसमवेत या उपक्रमात त्यांच्या मातांनीही आपला सहभाग नोंदवला. परीक्षकाची भूमिका प्रिती भगत यांनी निभावली. विशाल गिरी ॲक्टींग स्कूलची विद्यार्थिनी पूजा शिंदे हिला यावेळी बेस्ट ॲक्टींगचा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या फॅशन शो बद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल गिरी म्हणाले की, लातुरात आयोजित करण्यात आलेल्या या लहान मुलांच्या फॅशन शो ला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या मुलांना जाहिराती आणि चित्रपटाच्या माध्यमातून कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लातूर ही गुणवंतांची खाण आहे. याठिकाणी असलेल्या गुणवंत कलाकारांच्या गुणवत्तेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण व आपली अकॅडमी प्रयत्नशील असल्याचे विशाल गिरी यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी पोतदार यांनी केले. या फॅशन शो ला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.