• Tue. Apr 29th, 2025

“नीतीमत्ता समितीने अत्यंत गलिच्छ आणि हीन प्रश्न विचारत पातळी सोडली म्हणूनच…”, महुआ मोईत्रांची प्रतिक्रिया

Byjantaadmin

Nov 3, 2023

प्रकरणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा या नीतीमत्ता समितीच्या (ethics committee) बैठकीतून बाहेर पडल्या. यामागचं कारण त्यांनी आता पीटीआयला सांगितलं आहे. मला विचारण्यात आलेले प्रश्न हे अत्यंत गलिच्छ आणि खालच्या पातळीचे होते. त्यामुळेच मी ती बैठक सोडली. प्रश्न विचारताना त्यांनी मर्यादा सोडल्याने मी बैठक सोडून निघून आले असा आरोप महुआ मोईत्रांनी केला आहे. याच संदर्भात महुआ मोईत्रांनी इंडियन एक्स्प्रेसशीही संवाद साधला.

महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?

महुआ मोइत्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले, “देशातील १४० कोटी जनतेपैकी ७८ महिला खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी मी एक आहे. माझ्यावर केले गेलेल्या आरोपातील तथ्य समोर आणण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी मी संसदेच्या नीतीमत्ता समितीला सहकार्य करण्यास तयार होते. पण सत्य जाणून घेण्याऐवजी माझे चारित्र्यहनन करण्यात आले, नको ते प्रश्न विचारण्यात आले. माझ्याबद्दल घृणास्पद, असभ्य आणि वैयक्तिक टिप्पण्या करण्यात आल्या. जसे की, मी कुणाशी बोलते, रात्री किती उशीरापर्यंत बोलते, एक्स सोशल साईटवरील एक व्यक्ती माझ्या जवळची आहे का, त्या व्यक्तीच्या पत्नीला याबाबत काय वाटते, मागच्या पाच वर्षात मी कोणत्या हॉटेलमध्ये कुणाबरोबर राहिले.. आदी प्रश्न मला विचारण्यात आले.”“समितीच्या सदस्यांनी वारंवार हस्तक्षेप करून आणि औचित्याला धरून प्रश्न विचारण्याची विनंती करूनही त्यांनी (अध्यक्षांनी) लिखित प्रश्नांचा भडीमार सुरूच ठेवला. हे लिखित प्रश्न त्यांना एका पक्षाकडून पुरविण्यात आले होते, हे स्पष्टपण कळत होते. हे प्रश्न अतिशय खालच्या दर्जाचे, अनपेक्षित होते. संविधानाने दिलेल्या गोपनियतेच्या अधिकाराचे हनन होत असताना आणि एक महिला खासदार म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडत असताना माझी प्रतिष्ठ ज्याठिकाणी ओरबाडली जात असेल, त्याठिकाणी एक मिनिटापेक्षाही अधिक काळ बसून राहणे मला पटणारे नव्हते. त्यामुळे मी तिथून निघून आले” दर्शन हिरानंदानी यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं त्या प्रकरणी थेट प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा मी उत्तर देत होते. मात्र हॉटेलचं बिल कुणी दिलं? तुम्ही कुणाबरोबर राहिला होतात? असे प्रश्न विचारण्यात आल्याने माझा पारा चढला आणि मी तिथून निघून आले. आता मी चौकशीत सहकार्य केलं नाही असा आरोप होतो आहे. मात्र मला विचारण्यात आलेले प्रश्न गलिच्छ आणि पातळी सोडलेले होते. त्यामुळे मी त्याची उत्तरं दिली नाहीत. असंही महुआ मोईत्रांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed