राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याचं कारण आहे महाराष्ट्र भाजपने आज संध्याकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ट्विट केलेला व्हिडिओ… अचानक हा व्हिडिओ भाजपने ट्विट केल्याने मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वीच दिल्ली वारी झाली. आता आज महाराष्ट्र भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन… या शीर्षकाखाली हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…, असं देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. ३१ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. आणि आता या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना एकच उधाण आलं आहे.
शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरू असताना भाजपकडून सूचक ट्विट करण्यात आलं आहे. भाजपने ट्विट केलेल्या व्हिडिओच्या टाइमिंगवरूनही चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपने ट्विट केलेल्या या व्हिडिओवर पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला या व्हिडिओबाबत कुठलीही माहिती नाही. कुणी ट्विट केलंय आणि का केलंय? याची माहिती घेऊन नंतरच यावर भाष्य करणं योग्य ठरेल. पक्षाच्या वतीने अशी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले.दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपूर्वी होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या विस्तारात आता मोठे फेरबदल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.