• Wed. Apr 30th, 2025

लातूर ग्रंथोत्सव 2022’चे थाटात उद्घाटन;ग्रंथ वाचनातून माणूस घडतो-डॉ. जनार्दन वाघमारे

Byjantaadmin

Nov 22, 2022

लातूर ग्रंथोत्सव 2022’चे थाटात उद्घाटन;ग्रंथ वाचनातून माणूस घडतो-डॉ. जनार्दन वाघमारे

▪️ ग्रंथ प्रदर्शनात अकरा ग्रंथ विक्रीचे दालने

▪️ मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष चित्र प्रदर्शन

लातूर(जिमाका) : ग्रंथ वाचनामुळे माणसाच्या मनात ज्ञानाचे झरे निर्माण होतात. त्यामुळे माणूस वैचारिक, विवेकी बनतो. ग्रंथांमुळेच चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस घडतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मांडले. तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आयोजित दोन दिवसीय ‘लातूर ग्रंथोत्सव 2022’च्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
माजी राज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आत्मकथनकार सुनिता अरळीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिळे, डॉ. सतीश यादव, डॉ. भातांबरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यावेळी उपस्थित होते.
ग्रंथ हा माणसाचा खरा निस्वार्थी मित्र आहे. ग्रंथांशी मैत्री केल्यानंतर माणसाचे ज्ञान वाढते. ग्रंथ कोणत्याही परिस्थितीत आपली साथ सोडत नाहीत, ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीच्या विषयातील ग्रंथ वाचण्याची आवड जोपासावी. ग्रंथ वाचनातून संस्कार मिळतात, तसेच त्याची विवेकशक्ती वाढवण्याचे काम ग्रंथ करतात. त्यामुळे ग्रंथांची निवड करताना डोळसपणा दाखविणे आवश्यक असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
शिक्षणाच्या प्रसारामुळे वाचन चळवळ वाढण्यास मदत झाली आहे. तसेच समाजातील विविध घटकांमधून साहित्य निमिती होऊ लागली आहे. ग्रामीण भागातही वाचन संस्कृती रुजवणे आवश्यक असून त्यासाठी सार्वजनिक वाचनालयांच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत. तसेच प्रत्येक साहित्यप्रेमी नागरिकाने वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मातृभाषा मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजीसारख्या भाषेतील ग्रंथांचेही वाचन व्हायला हवे, असे डॉ. वाघमारे यावेळी म्हणाले.
ग्रंथ हे आपल्या गुरूची भूमिका बजावितात. माणसाच्या मस्तकाला योग्य दिशा देण्याचे काम ग्रंथ करतात. त्यामुळे चांगला समाज घडण्यासाठी वाचन चळवळ वाढण्याची गरज आहे. बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच पालकांवरही वाचन संस्कार होणे आवश्यक आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हा विचार लक्षात घेवून प्रत्येकाने ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी केले.
ग्रंथांमधून विचारांची शिधोरी मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत अनेक महान व्यक्तीमत्वांच्या जडणघडणीत ग्रंथांची भूमिका महत्वाची होती. जीवनात प्रगती साधण्यासाठी ग्रंथांशी मैत्री करण्याची गरज असून ग्रंथ वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानातून प्रभावी व्यक्तिमत्व घडते. आज जगात ज्ञानाला किंमत असून हे ज्ञान मिळविण्यासाठी ग्रंथ वाचनाला सर्वांनी महत्व दिले पाहिजे, असे आमदार श्री. पाटील यावेळी म्हणाले.
ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून दोन दिवस साहित्यप्रेमींना मेजवानी मिळणार असून जिल्ह्यात वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी पयत्न करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक साहित्यप्रेमीने ग्रंथदूत म्हणून काम करावे, असे आवाहन श्री. गुडसूरकर यांनी केले.
ग्रंथ वाचनाची आवड प्रत्येकाने जोपासली पाहिजे. ग्रंथ हे माणसाचे मस्तक समृद्ध करतात. त्यामुळे पुढील पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी ग्रंथ विकत घेवून वाचायला हवा, असे मत श्री. सिंदगीकर यांनी व्यक्त केले.
ग्रंथांशी मैत्री केली तर माणूस आयुष्यात कधीही एकटा पडत नाही. साहित्य निर्मिती, ग्रंथ चळवळीला बळ देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ग्रंथ वाचनाला महत्व दिले पाहिजे, असे श्रीमती अरळीकर यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये श्री. गजभारे यांनी ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. वाचकांना एकाच छताखाली विविध ग्रंथ उपलब्ध करून देण्यासोबतच वाचक-लेखक संवाद घडावा, साहित्यविषयक मंथन व्हावे, यासाठी दोन दिवसीय ग्रंथोत्सव आणि ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. सी. पाटील यांनी केले, तर ग्रंथालय निरीक्षक सोपान मुंडे यांनी आभार मानले.

ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनांचे उद्घाटन

‘लातूर ग्रंथोत्सव 2022’निमित्त नगर भवन येथे उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनी व विक्री दालनांचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या अकरा दालनांमध्ये विविध विषयांवरील ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध असून 22 नोव्हेंबर रोजी रात्री नऊपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयक दालनाला आ. पाटील यांची भेट

यंदाचे वर्ष हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने ग्रंथोत्सवात मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी माहिती देणारी दुर्मिळ वृत्तपत्रे, बातम्यांची कात्रणे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज या दालनाला भेट दिली. तसेच या प्रदर्शनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed