लातूर जिल्ह्यात स्त्री जन्माचा टक्का वाढला…!!*
लातूर दि.20 ( जिमाका ) गेल्या काही वर्षात लातूर जिल्ह्यातील स्त्री जन्माचा दर पुरुषांच्या तुलनेत चिंतनीय कमी झाला होता.. 2016 साली लातूर जिल्ह्यात हजार पुरुष जन्मा मागे 889 एवढा स्त्री जन्म दर होता. ‘जिच्या हाती पाळण्याच्या दोरी..तीच जगाला उद्धारी’ असं आपण म्हणतो आणि स्त्री जन्माचा दर एवढा कमी झाल्यानंतर ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ ‘ हा कार्यक्रम हाती घेतला होता. आता सप्टेंबर 2023 च्या जन्मदरानुसार हा टक्का दर हजारी 947 एवढा झाला आहे. राज्याची सरासरी 927 आहे, त्यापेक्षाही लातूरचा टक्का वाढल्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी आनंद व्यक्त केला.
देवणी तालुक्यातील स्त्री जन्माचे प्रमाण 1074 तर अहमदपूर तालुक्याचे प्रमाण 993 एवढे आहे. मात्र जिल्ह्यातील जळकोट 858, रेणापूर 839 आणि शिरूर अनंतपाळ 824 एवढे आहे.तर औसा येथे 931, चाकूर 917, लातूर 954, निलंगा 906, उदगीर 972 असे प्रमाण आहे. जिथे स्त्री जन्माचे प्रमाण कमी आहे त्याठिकाणी जाऊन विशेषतः ज्या घरी पहिली मुलगी आहे. दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या मातांच्या घरी जाऊन त्यांना बोलणे मुलगा – मुलगी या काळात समान आहेत हे सांगून महिलांसाठीचे कायदे, योजना सांगून त्यांचे समुपदेशन करणे, स्त्री रुग्णालयामध्ये वेळच्या वेळी जाऊन,त्यांच्याकडून कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी आरोग्य प्रशासनाने घ्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.