मुंबई:-शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांच्या अपमानावर शांत आहेत. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे, अशी घणाघाती टीका आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप व शिंदे गटावर केली.
तसेच, शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असा इशाराही ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे.
निषेधाचा साधा ‘ब्र’ नाही
ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे की, राज्यपालांनी शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत.
राज्यपालांची मते वैयक्तिक नसतात
ठाकरेंनी म्हटले आहे की, शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे? शिवरायांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात. शिवरायांचा विचार जुना झाला, असे आपले राज्यपाल बरळतात. भाजपचे एक आमदार संजय कुटे यांनी आता जाहीर केले, ‘‘राज्यपालांनी शिवरायांबाबत जे घाणेरडे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.’’ घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती व्यक्तिगत मते व्यक्त करू शकत नाही. ती मते राज्याची व राष्ट्राची असतात हे त्या कुटे यांना कोणीतरी सांगायला हवे. स्वत:च्या अंगलट आले की, वैयक्तिक मते. मग राहुल गांधींची मतेही वैयक्तिक ठरवा!
राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष
ठाकरेंनी म्हटले आहे की, मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे. राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली.शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला. आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत?