मुंबई : लग्नाच्या नोंदणी रजिस्टर ऑफिसला गेलेल्या दिव्यांग तरुणीला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन उचलून न्यावे लागले. यामुळे तरुणीने समाज माध्यमांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणीची माफी मागितली.एक्स या सोशल मीडियावरुन विराली मोदी नावाच्या तरुणीने आपली व्यथा मांडली आहे. दिव्यांग हक्क कार्यकर्ता असलेल्या विरालीचे १६ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. यावेळी आपला अनुभव सांगताना ती म्हणाली की खार भागातील रजिस्ट्रार कार्यालयात ती विवाह नोंदणीसाठी गेली, मात्र तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
काय आहे विरालीची पोस्ट?
“मी दिव्यांग आहे. माझे लग्न १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील खार येथील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झाले. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असून तिथे लिफ्ट नव्हती. संबंधित अधिकारी माझी स्वाक्षरी घेण्यासाठी खाली यायला तयार नव्हते. त्यामुळे मला लग्नासाठी पायऱ्यांवरुन उचलून न्यावे लागले” अशी पोस्ट विरालीने बुधवारी लिहिली होती.
विवाह नोंदणी कार्यालयातील पायऱ्या गंजलेल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दिव्यंगत्वाची पूर्वसूचना देऊनही कोणीही कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आलं नाही. लग्नासाठी ऑफिसमध्ये जात असताना पायऱ्यांवरून पडून मला काही झालं असतं तर? असा सवालही तिने केला.