लातुर:- तब्बल २५०० झाडांचा वाढदिवस साजरा केला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे गेल्यावर्षी आजच्याच दिवशी लावलेल्या अडीच हजार झाडांचा ग्रीन झोन तयार करण्यात आला होता.
यामध्ये १३० प्रजातींची विविध औषधी वनस्पती वेली फुलझाडे लावण्यात आली होती गेली वर्षभर त्या ठिकाणी सातत्याने श्रमदान करून वेळोवेळी वाढलेले केवत काढून नियमितपणे झाडांना पाणी देऊन झाडे वाढवली होती झाडे जपली होती.
आज त्या सर्व झाडांचा पहिला वाढदिवस साजरा केला.
ग्रीन लातूर वृक्ष लातुर टीमचे अध्यक्ष कडूलिंबाचे झाड याला प्रातिनिधिक स्वरूपात फुलांचे हार, फुगे, माळा, झिरमिळी यांनी अत्यंत सुरेख आणि उत्कृष्ट पद्धतीने सजवण्यात आले होते. यावेळी केक कापून अडीच हजार झाडांचा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य , उपप्राचार्य सगळे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वांनी श्रमदान करून झाडाभोवती आळे केले. झाडाभोवतीचे गवत काढलं, झाडांना पाणी दिलं. आजच्या आठवणीच्या निमित्ताने एक मोठं चाफाचे झाड सुद्धा लावलं.
ग्रीन लातूर वृक्ष टीमला आज कार्य करत सोळाशे दिवस पुर्ण झाली. त्यानिमित्ताने उपस्थित सदस्यांनी आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेत आनंदोत्सव साजरा केला.
जगभरात कुठेही होत नसेल, झालेलं नसेल अस या सोळाशे दिवसात दररोज चार तास अखंड दररोज नित्य नियमाने श्रमदान सुरू होते. ग्रीन लातूर वृक्ष टीम सोबत श्रमदान करणाऱ्या, तन मन धनाने कार्य करणाऱ्या सगळ्यांसाठी ही आनंदाची व भूषणावह बाब आहे. सोळाशे दिवसात उद्देश एकच ठेवला स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, आणि हरित लातूर. त्या दिशेने सोळाशे दिवसांची वाटचाल केली, यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भव्य असं यश मिळालं. आपलं लातूर पूर्वीपेक्षा काही पटीनं म्हणजे शंभर पटींने हिरवं दिसत आहे, शहरात झाडांची संख्या वाढली आहे, शहराचे हरित आच्छादन वाढले आहे. शहराचे तापमान कमी झाले आहे.