• Sun. Jun 22nd, 2025

रामायणातील हनुमान भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लढणार; मध्यप्रदेशातील रणभूमी कोण गाजवणार?

Byjantaadmin

Oct 15, 2023

congress  मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेस नेते कमलनाथ निवडणूक लढवणार आहेत. तर बुधनी येथून भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढणार आहेत. मात्र, काँग्रेसने शिवराज सिंह चौहान यांना चांगलीच डोकेदुखी दिली आहे. काँग्रेसने बुधनी येथून रामायण या लोकप्रिय मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याला तिकीट दिलं आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून भाजप ही निवडणूक कशी हाताळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MP Congress Candidate List : रामायणातील हनुमान भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लढणार; मध्यप्रदेशातील रणभूमी कोण गाजवणार?

 

काँग्रसने अभिनेते विक्रम मास्ताल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. मास्ताल यांना बुधनी येथून तिकीट देण्यात आलं आहे. मास्ताल हे लोकप्रिय अभिनेते आहेत. 2008मध्ये आलेल्या रामायण मालिकेत मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा अधिकच गाजली होती. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि रामानामाचा जयघोष करणाऱ्या भाजपसमोर आता मालिकेतील हनुमानाचं आव्हान उभं राहिल्याने बुधनी येथील निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंद सिंह लाहर हे सुद्धा निवडणूक लढणार आहेत. तर इंदौर-1 या मतदारसंघातून काँग्रेसने भाजपचे उमेदवार कैलास विजयवर्गीय यांच्या विरोधात संजय शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. शुक्ला यांची ही पारंपारिक सीट आहे. तसेच ते या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांना विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे.

निवडणुका कधी?

मध्यप्रदेशातील 230 जागांवर 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 7 आणि दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगानात सर्वच्या सर्व 119 जागांवर 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी पाचही राज्यात मतमोजणी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *