टीपु सुलतान: दी फस्ट फ्रिडम फायटर ऑफ इंडिया!
जगामध्ये असे काही बोटावर मोजण्याइतके राज्याकर्ते होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासात स्वतःचे नाव अजरामर केले आहे. आणि त्या मोजक्या लोकात म्हैसूरचे राज्यकर्ते टीपु सुलतान यांचा समावेश होतो.
“शंभर दिवस बकरी बनुन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनुन जगणे, कधीही बेहत्तर!” या आपल्या उक्तीप्रमाणे टीपु सुलतान यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करण्यापेक्षा मृत्यूला आलिंगन दिले. भारताच्या इतिहासातील ‘टीपु सुलतान’ हे एक आकर्षक व्यक्तिमत्व आहे. या शुर आणि धाडसी व्यक्तीने आपला स्वाभिमान अखेरपर्यंत जोपासला आणि वेलस्लीची तैनाती फौज स्वीकारण्याचे नाकारले.
टीपु सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ब्रिटिश इतिहासकार ‘सर जाॅन शोअर’ म्हणतो, “हैदरअली आणि फातिमा यांना नवसायासाने झालेला मुलगा म्हणजे टीपु सुलतान. टीपुचे व्यक्तीमत्व घडविण्यात हैदरअलीचा मोठा वाटा होता. टीपु अष्टपैलू व्यक्तीत्वाचा स्वामी होता. काळाच्या गरजेनुसार टीपुला सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले. टीपुची अनेक भाषांवर उत्तम पकड होती. तो अरबी, फारसी, कन्नड याबरोबरच इंग्रजी भाषादेखील सहजतेने बोलत असे. याशिवाय तो घोडेस्वारी, तलवार आणि बंदुक चालविण्यात पारंगत होता. पालखी या स्रिया आणि रोग्याकरिता असतात असे म्हणून तो पालखीचा वापर करत नसे. टीपुकडे स्वतःची मोठी अशी लायब्ररी होती. त्याला नवनवीन प्रयोगांची आवड होती. पाश्चिमात्य विज्ञान आणि राजकीय सिद्धांत यांचा तो आदर करीत असे. त्याच्या काळात ‘फ्रेंच राज्यक्रांती’ झाली तेंव्हा त्याच्याच पुढाकाराने श्रीरंगापट्टणम् येथे ‘जॅकोबीन क्लब’ची स्थापना झाली आणि तो स्वतःला ‘नागरिक टीपु’ म्हणु लागला”.
टीपु सुलतान यांच्या हाती जरी निरंकुश सत्ता असली तरी ते क्रुर आणि बेलगाम शासक नव्हते. आपण प्रजेसंबंधी जो व्यवहार करत आहे, त्याबाबत कयामतच्या दिवशी परमेश्वराला जाब द्यावा लागणार आहे, असे ते मानत असत. एक कर्तव्यपरायण राजाप्रमाणे त्यांनी सदैव प्रजेच्या हिताची कामे केली. शिक्षण, कृषी, कला, साहित्य, लष्कर, महसूल या सर्व बाबतीत आदर्श व्यवस्था निर्माण केली. ‘अग्निबाण’सारख्या अभिनव शस्त्राचा युद्धात प्रभावी वापर करून इंग्रजांना नामोहरम करून सोडले.
साम्राज्यवादी इतिहासकारांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये फुट पाडण्यासाठी इतिहासाचं सांप्रदायिकरण करून टीपु सुलतान यांची प्रतिमा धर्मांध आणि हिंदूविरोधी अशीच बनवली. टिपु सुलतान यांचा मुख्य सल्लागार पंडित पुर्णय्या हा एक ब्राह्मण होता. टीपु सुलतान यांनी अनेक मंदिरांना देणग्या दिल्या होत्या याशिवाय मंदिरांच्या खर्चाची व्यवस्था म्हणून जमिनी दान दिल्या होत्या. आपली राजधानी असलेल्या श्रीरंगापट्टणमच्या किल्ल्यात असलेल्या गंगाधरेश्वराच्या पुजाविधित त्यांनी कधीच अडथळा निर्माण केला नाही.
आपल्या पित्याप्रमाणे टीपु सुलतान हे प्रचंड इंग्रजद्वेष्टे होते. इंग्रजांना आत्ताच भारताबाहेर हाकालले नाहीतर हे इंग्रज एक दिवस संपुर्ण भारताला गुलाम बनवणार, याची पक्की खात्री झालेल्या टीपु सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध परदेशी मदत मिळवण्यासाठी आपले दुत फ्रांस, इराण, माॅरीशस, अफगाणिस्तान अशा देशात पाठवले. त्यांनी पराक्रमी फ्रेंच राज्यकर्ता ‘नेपोलिअन बोनापार्ट’ याच्याशी देखील पत्रव्यवहार केले जो इंग्रजांचा कट्टर शत्रू होता. पण आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या असलेल्या ब्रिटिश साम्राज्यासमोर टीपु सुलतान यांचा निभाव लागला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्रीरंगापट्टणमचा किल्ला लढवत 4 मे 1799 रोजी पराक्रमाची शर्थ करत टीपु सुलतान धारातिर्थी पडले.
टीपु सुलतान यांच्या मृत्यूनंतर त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल लाॅर्ड वेलस्ली इंग्लडला लिहीलेल्या पत्रात म्हणतो,”टीपु सुलतान मारला गेला. आता संपुर्ण भारत आपला!” यावरून असे दिसते की इंग्रजांच्या भारत विजयातील टीपु सुलतान हे सर्वात मोठे अडसर होते.
– शाहबाज इ. तालिकोटे ✍