• Wed. Apr 30th, 2025

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विशेष लेखमाला;पापविनाश मंदिर लातूरच्या इतिहासाचे सोनेरी पान …..!! (भाग-2)

Byjantaadmin

Nov 20, 2022

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विशेष लेखमाला;पापविनाश मंदिर लातूरच्या इतिहासाचे सोनेरी पान …..!! (भाग-2)

 

जागतिक वारसा सप्ताह 19 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत असतो. आपला संपन्न वारसा लोकांना कळावा, त्याचे जतन व्हावे… तो वारसा गौरविला जावा… हा सप्ताह मागचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आपलाही संपन्न वारसा कळावा म्हणून आम्ही 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर “वारसा लातूरचा” ही लेखमाला देत आहोत. या लेखमालेचा हा दुसरा भाग…!!*_

लातूर शहरात असलेल्या प्राचीन भूतनाथ मंदिरापासून जवळच पापविनाश हे भव्य तीर्थ आहे. या मंदिरात आढळलेला शिलालेख लातूरच्या संपन्न वारशाची महत्वपूर्ण नोंद उलघडतो. 10 फेब्रुवारी 1128 तिथी असलेल्या या शिलालेखाचे वाचन प्रसिद्ध इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी केले असून यावरून लातूर शहराचे प्राचीन नाव ‘लत्तलौर’ असल्याचे सिद्ध झाले आहे. याठिकाणी पाचशे विद्वानांचे वास्तव्य होते, अशीही नोंद आढळते. कल्याणीचा चालुक्य राजा आहवमल्ल, त्याचा मुलगा परमर्दि व त्याचा मुलगा भुलोकमल्ल अशा तीन पिढ्यांचा उल्लेख या शिलालेखात आढळतो.

प्रत्यक्षात आहवमल्ल, परमर्दि व भुलोकमल्ल ही नावे नसून पहिला सोमेश्वर, त्याचा पुत्र सहावा विक्रमादित्य व त्याचा पुत्र तिसरा सोमेश्वर या राजांची ही बिरुदे आहेत. याविषयी आणखी एक महत्वपूर्ण नोंद हिरे मुदनूरच्या शिलालेखात सापडते. यामध्ये उल्लेख असलेला महामंडळेश्वर जोगमरस, माडगीहाळ शिलालेखात उल्लेखिलेला कुंतलदेशी जोगम बिज्जल आणि तालिकाड जोग मनूप हे तीन वेगवेगळे राजे नसून जोगमरसाचा उल्लेख तीन वेगवेगळया नावाने आलेला आहे. तेर येथील त्रिविक्रम मंदिरातील शिलालेखातही जोगमरसाचा उल्लेख आहे. जोगमरसाच्या पत्नीचे नाव तारादेवी असे असून तिच्या कन्येचा-सावळादेवीचा विवाह चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्याशी झाला होता. शके 1000 ची ही घटना असून याच विक्रमादित्याचा उल्लेख भूतनाथ मंदीराच्या शिलालेखात आढळतो.

‘सिध्देश्वर’ हे या नगरीचे ग्रामदैवत. येथे सिध्देश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात बाराव्या शतकातील एक शिलालेख आहे. तो वाचन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे- “स्त्री सिध्देश्वर-देवराय वसते हार ने य अकाधारो अरी अ ऐ ग्रोम हलं निवर्त नानि 36 प्रतिपालनयेम ! ब्राम्हण तपो धना नामधिकारो हरेत वसुंधरोषष्ठी वर्ष सहस्त्राणि विष्ठायां जायाते क्रिमी (मि: ) मंगल मह श्री.”!

हा शिलालेख दहा ओळीचा असून सिध्देश्वर देवाला 36 निवर्तने भूमि दिल्याचा उल्लेख त्यात आहे.
शिरूर-अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी येथेही एक लेखयुक्त शिळा सापडली आहे. या शिळेवर एकुण तीन लेख कोरलेले असून त्यापैकी दोन लेख चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याचे असून तिसऱ्या लेखात राजवंशाचा उल्लेख नाही. गणेशवाडी हे चालुक्य काळात पाशुपत शैव पंथाचे किंवा शिवलिंगी संतांचे मुख्यपीठ होते. या पंथाच्या गणेशवाडी येथील पाठशाळेच्या संचालनासाठी शैव आचार्याची नियुक्ती करण्यात आल्याची नोंद या लेखात केलेली आहे.
(क्रमशः)

– युवराज पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed