• Thu. Aug 21st, 2025

भारतात उपासमारीची स्थिती चिंताजनक!

Byjantaadmin

Oct 13, 2023

भारतात उपासमारीची स्थिती पाकिस्तानपेक्षाही चिंताजनक; काय सांगते ग्लोबल हंगर इंडेक्सची आकडेवारी?

नवी दिल्ली : एखाद्या देशातील अन्नधान्याची उपलब्धता, पोषण-कुपोषण स्थिती आदी निकषांच्या आधारे नोंदवली जाणारा सन २०२३साठीचा जागतिक भूक निर्देशांक अहवाल जाहीर झाला असून, १२५ देशांच्या यादीत भारताची १०७वरून १११व्या स्थानी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने हा निर्देशांक फेटाळत, त्याच्या मापनातच चुका, त्रुटी आहेत, अशी बाजू मांडली आहे प्रत्येक देशातील कुपोषितांचे प्रमाण, पाच वर्षांवरील मुलांमधील कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण, पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण असे काही निकष भूक निर्देशांक मोजताना वापरले जातात.

कृश मुलांचे प्रमाण सर्वाधिक

मुलांची उंची व वजन यांच्या गुणोत्तरावर आधारित असलेल्या मापदंडात भारताची कामगिरी सर्वांत खराब ठरली आहे. भारतातील १८.७ टक्के मुले ही कृश आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

कुपोषणाचे प्रमाण १६.६ टक्के

भारतातील कुपोषित मुलांचे प्रमाण १६.६ टक्के असून, पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण ३.१ टक्के आहे, अशी आकडेवारी या अहवालात मांडण्यात आली आहे.

पांडुरोगाचे प्रमाण…

रक्तातील तांबड्या पेशींच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या पांडुरोगाचा सामना करणाऱ्या भारतीय महिलांचे प्रमाणही या अहवालात देण्यात आले आहे. भारतातील १५ ते २४ वर्षे वयोगटातील ५८.१ टक्के महिला पांडुरोगाचा सामना करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

शेजाऱ्यांचे काय?

पाकिस्तान १०२, बांगलादेश ८१, नेपाळ ६९, श्रीलंका ६० अशा शेजारी देशांची या सूचीतील क्रमवारी आहे. हे सारेच देश यादीत भारताच्या वर आहेत.

केंद्र म्हणते, मापनच चुकीचे

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने या अहवालातील निष्कर्ष ठामपणे फेटाळले आहेत. संबंधित निष्कर्ष काढणारे मापनच चुकीचे, त्रुटीपूर्ण आहे. यातील निकषांवरून थेट देशाचा भूक निर्देशांक मोजणे चुकीचे आहे. असल्या अहवालामागील हेतूच संशयास्पद आहे, असे मंत्रालय म्हणते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *