• Wed. May 7th, 2025

महिला आयोग आपल्या दारी : पीडित महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आराखडा तयार करा – रुपाली चाकणकर

Byjantaadmin

Oct 11, 2023

अमरावती, (जिमाका): महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पीडित महिलेला आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत एकत्रित आराखडा तयार करण्यात यावा. या प्रकल्पाची शिफारस राज्य महिला आयोगामार्फत राज्य शासनाला करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले.‘महिला आयोग आपल्या दारी’, या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारींची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज घेतली. त्यांनतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विविध शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्या आभा पांडे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगातर्फे ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची सुनावणी घेण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रारी वर्ग करण्यात आल्या असून या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिले.

बाल विवाह रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या ग्रामपंचायत हद्दीत बाल विवाह होईल व तेथे त्यांच्या वयाची खोटी नोंद आढळून आल्यास तेथील सरपंच, नोंदणी अधिकारी, लग्नाची पत्रिका छापणारे प्रिंटर, लग्न सभागृह तसेच लग्न समारंभाच्या आयोजन कार्यात सहकार्य करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील. याबाबत कठोर पावले उचलल्यास बाल विवाहावर आळा बसेल. विवाह नोंदणीसाठी नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही आपापल्या भागात बाल विवाह होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाल विवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.गर्भलिंग निदान चाचणी होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत कठोर कार्यवाही करण्यात यावी. बरेचदा महिला भावनिकतेला बळी पडून मानवी तस्करीमध्ये गुरफटल्या जातात. अशावेळी पालक आणि मुलांचा संवाद वाढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शालेय स्तरावर शिक्षक, पालक संघटनेच्या माध्यमातूनविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. यासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घ्या. जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, ही बाब गंभीर आहे. यावर लवकरच कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.

जिल्हा परिषद अमरावती मार्फत जिल्ह्यामध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमातंर्गत विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये प्राथमिकच्या 711 शाळा व माध्यमिकच्या 44 अशा एकूण 755 शाळांचा समावेश आहे. याबाबत श्रीमती चाकणकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कार्य चांगले असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, परिवहन, दामिनी पथक, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, पोलीस दीदी अशा विविध विभागांचा आढावा घेतला. कौटुंबिक तक्रारी सोडविण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन आवश्यक आहे. आजकाल विभक्त कुटुंब पध्दतीमुळे पाल्यांशी संवाद कमी होत आहे. यासाठी घरातील वातावरण संवादी असावे. यासाठी पालकांनीही लक्ष द्यावे. तसेच स्पर्धेच्या युगामुळे आपल्या जोडीदाराविषयी विवाहेच्छुकांच्या अपेक्षा बदलत आहे. यासाठी लग्नापूर्वी समुपदेशन होणे आवश्यक असल्याचे श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या.

श्रीमती चाकणकर यांनी काल (दि. 9) धारणी तालुक्यातील कढाव गावाला भेट दिली. तेथे त्यांनी विविध कुटुंबांना भेटी दिल्या. शालेय विद्यार्थी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापित बचत गटांना भेटी दिल्या. माविममार्फत मिळालेल्या कृषी औजार बँकेलाही भेट दिली. येथे तेजस्वी अर्थसहाय्य योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून अपंग महिलेने शिलाई मशीन घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. या महिलेशी त्यांनी संवाद साधला. तसेच वलगाव, अमरावती येथील अंगणवाडी केंद्र 706 येथे भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी बालकांसह अंगणवाडी सेविकांसमवेत संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *