नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे ( Rahul Gandhi On Savarkar ) पडसाद सावरकरांच्या जन्मभूमीत उमटले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज भगूर बंदची हाक देण्यात आली आहे. भगूर बंद ठेवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये आज सर्व व्यवहार बंद आहेत. भगूरमधील बाजारपेठा आणि इतर सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भगूरमधील नागरिकांनी बंदला दिलेला पाठिंबा पाहता राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे.

बंद पुकारण्याआधी नाशिक जिल्ह्यातील भगूर या सावरकर यांच्या जन्मभूमीत आंदोलनही करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन पुकारले होते. भगूरमधील या सर्व घडामोडी पाहता राहुल गांधींनी सावरकरांबद्दल जे वक्तव्य केले होते, त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सावरकरांच्या जन्मभूमीत उमटल्याचे दिसत आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर सावरकर यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक करण्यात आला आणि आता थेट भगूर बंदची हाक देण्यात आली.राज्यासह नाशिक जिल्ह्यात हीच परिस्थिती पहायला मिळत आहे, जी भगूरमध्ये निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनं तीव्र होताना दिसत आहेत. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून आणि भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा गुरुवारी निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले होते. आणि त्यानंतर आज भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट या तिन्ही पक्षांनी भगूरमध्ये आंदोलन पुकारले.
भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. पण त्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत सावरकरांच्या पत्राचे पुरावे सादर करत राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह सावरकरांच्या जन्मभूमीत तीव्र पडसाद उमटले आहे.