• Sat. May 3rd, 2025

“माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…”, अजित पवारांचं महाराष्ट्राला खुलं पत्र!

Byjantaadmin

Oct 10, 2023

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातला एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. २ जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकतीच राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची पालकमंत्रीपदीही वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे पक्षातील आमदार अपात्रता व पक्षचिन्हाचा वाद यावर अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगासमोर सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सरकारमधील १०० दिवसांच्या पूर्ततेनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला खुलं पत्र लिहिलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. “आज १० ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली NCP पक्ष   पत्रात नमूद केलं आहे.

बहुजनांचा विचार हे सूत्र!

दरम्यान, आपल्यासाठी वसा विकासाचा, विचार बहुजनांचा हे सूत्र असेल, असं अजित पवारांनी नमूद केलं आहे. “प्रत्येक काळ व त्या काळातील आव्हानं वेगवेगळी असतात. त्या आव्हानांचा सामना करत लोककल्याणासाठी लोकप्रतिनिधींना काम करावं लागतं. आपण लोकांचे देणे लागतो व त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिलं आहे या भूमिकेवर माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे”, असं अजित पवार पत्रात म्हणाले आहेत.

पुढे काय?

“येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या, विविध समाजघटकांच्या हितांचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून कार्यरत असेलयाची प्रचिती मी व माझ्या सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. राजकारणाच्या पलीकडे असणाऱ्या भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावं लागतं. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून हे काम अधिक जोमाने करेल”, असंही पत्रात लिहिलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार व वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे”, असं आश्वासन अजित पवारांनी पत्रात दिलं आहे.

या पत्राच्या शेवटी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून अजित पवार यांनी सही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *