• Sat. May 3rd, 2025

ज्यांनी खालच्या थरावर जाऊन राजकारण केले ते सगळेच आजारी पडतील, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

Byjantaadmin

Oct 9, 2023

पुणे : युवा संघर्ष यात्रेनंतर ज्यांनी युवकांकडे दुर्लक्ष केले, युवक धोरणांना ताकद दिली नाही, खालच्या थरावर जावून राजकारण केले, अशी सगळीच लोकं आजारी पडतील. त्यामुळे ज्यांची तब्येत खराब आहे, त्यांनी काळजी घ्यावी, असा टोला आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना लगावला. आम्ही आमच्या तब्येतीची काळजी न करता ८०० किलोमीटरच्या संघर्ष यात्रेत युवकांचे प्रश्न घेऊन चालणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी युवक संघर्ष यात्रेची घोषणा केली असून पुणे ते नागपूर अशी ८०० किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पवार यांनी आपले काका अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून सारखे आजारी पडतात, त्यांना नवीन सत्ता मानवत नाही, असे आपणास वाटते का? असा प्रश्न रोहीत पवार यांना विचारण्यात आला होता.

rohit pawar And Ajit pawar 5

यावर आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेचा दाखला देत अजित पवारांचे नाव न घेता टीका केली. ‘युवा संघर्ष यात्रेनंतर ज्यांनी युवकांकडे दुर्लक्ष केले, युवक धोरणांना ताकद दिली नाही, खालच्या थरावर जावून राजकारण केले, अशी सगळीच लोकं आजारी पडतील. त्यामुळे ज्यांची तब्येत खराब आहे, त्यांनी काळजी घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.राज्यात सुरू असलेल्या राजकीय धोरणांमुळे युवा वर्ग मोठा प्रमाणात भरडला गेला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे युवा, उत्तीर्ण होऊन सुद्धा बेरोजगार असलेले उमेदवार, कंत्राटी पद्धतीने सुरू झालेली नोकरभरती, अश्या सगळ्या युवांचे प्रश्न घेऊन आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. पुणे ते नागपूर या यात्रेचा मार्ग असणार आहे.

कशी असेल यात्रा?

दसऱ्यानिमित्ताने येत्या २४ ऑक्टोबरला पुण्यातून पदयात्रेला प्रारंभ होईल. सावित्रीबाई आणि महात्मा फुले तसेच लाल महाल येथे नतमस्तक होऊन पाच ते सहा किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली जाईल. त्यानंतर शिरुर तालुक्यातील वढू तुळापूरला संभाजी महाराज यांना वंदन करून दुसऱ्या दिवसापासून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ होणार आहे.नऊ ऑक्टोबरला यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार आहे. पदयात्रेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले. कंत्राटी भरतीला स्थगिती द्यावी. तलाठी भरतीसह अन्य परिक्षांसाठी असलेले शुल्क रद्द करावे. दत्तक शाळांचा आदेश रद्द करावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे आहेत पण तेथे औद्योगिक कंपन्या आल्या नाहीत त्या ठिकाणी प्रकल्प आणावेत यासारख्या मागण्या या पदयात्रेद्वारे करण्यात येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *