• Wed. Apr 30th, 2025

राहुल गांधी सत्यच बोलले, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!

Byjantaadmin

Nov 18, 2022
“राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!तुषार गांधींचं राहुल गांधींना समर्थन!

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींच्या विधानाला भाजपा आणि मनसेसोबतच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाकडूनही विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेलं विधान योग्य की अयोग्य? अशी चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेत काही कागदपत्रही सादर केली. यावरून एकीकडे मनसेकडून राहुल गांधींच्या शेगावमधील यात्रेला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं जात असताना आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राहुल गांधी खरं तेच बोलले, असं तुषार गांधी म्हणाले आहेत.

तुषार गांधी आज शेगावमध्ये राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी संध्याकाळी ट्वीट केलं होतं. यामध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू एकत्र चालत असतानाचा एक जुना फोटो ट्वीट केला होता. त्यासोबत आपण राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली होती. त्यानंतर आज टीव्ही ९ शी बोलताना तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतचं त्यांचं वक्तव्य यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

“राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो”, असं ते म्हणाले. “राहुल गांधींनी मांडलेलं मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि पूर्ण आयुष्य इंग्रजांशी ते इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील, तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी जर सत्य लपवलं, तर सत्याशी त्यांनी निष्ठा नाहीये हे कळून येतं”, असंही तुषार गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *