बीड : सिक्कीम येथे मंगळवारी रात्री पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. तिथे कर्तव्यावर असलेले मुळचे बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. सुमारे तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगत होता. त्यांचे मूळगाव असलेल्या पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी त्यांचे पार्थिव उद्या आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे असलेली सैन्य दलाची वाहने देखील वाहून गेली. शहीद झालेल्या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे ( वय ३६ ) हे बेपत्ता झाले होते. आज त्यांचा मृतदेह सापडला आहे.
पर्यटक अडकले
ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे सिक्कीममध्ये हाहाकार माजला आहे. यामुळे पर्यटनासाठी गेलेले देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. यात सिल्लोड येथील दोन कुटुंबातील आठ जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबियांना मदत करण्याची विनंती अल्पसंख्यांक व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिक्कीम सरकारला पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, हे दोन्ही कुटुंब सुखरुप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.