“स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज” सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा धुमाळ
लातूर -स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यशासाठी परीक्षार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची गरज आहे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तथा लातूर जिल्ह्यातील राज्य गुप्त वार्ता विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा धुमाळ यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास विभाग द्वारा आयोजित इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटन व स्पर्धा परीक्षा वर बोलू काही या विषयावरील विस्तार व्याख्यान प्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर उपप्राचार्य प्रो. डॉ. राजकुमार लखादिवे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे आणि इतिहास अभ्यास मंडळाचे सचिव गौस शेख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना अनुराधा धुमाळ म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सातत्याबरोबर नियमित नियोजन व संयम ठेवण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना एखाद्या परीक्षेत अपयश आले की, विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास कमी होतो आणि नैराश्य येते. विद्यार्थ्यांनी परीक्षेतील अपयशाने खचून न जाता पुन्हा उत्साहाने व तितक्याच आत्मविश्वासाने परीक्षा दिली पाहिजे असेही त्या म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या प्रभावातून बाहेर पडून विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी करावा व आपले जीवन गतिमान करावे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे सांगून महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचले पाहिजेत त्यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने मार्गक्रमण करणे सुलभ जाते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे म्हणाले की, इतिहास मंडळाच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्व विकासासंबंधी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे असेही ते म्हणाले. यावेळी इतिहास मंडळाचे सचिव गौस शेख यांनी इतिहास अभ्यास मंडळाच्या अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शार्दुल गायके यांनी केले तर आभार सय्यद मुसेफ यांनी मानले. यावेळी इतिहास मंडळातील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभागातील प्रा. कुंदन लोखंडे, डॉ. शाहूराज यादव प्रा. भाऊसाहेब पुरी, डॉ. संगमेश्वर धाराशिवे, बालाजी डावकरे, आनंद खोपे, इतिहास मंडळातील कु. तोगरे, सदाशिवम व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला इतिहास विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.