अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला निलंगा तालुक्यातील हजारो मराठा बांधव जाणार – सकल मराठा समाजाचा निर्धार
निलंगा(प्रतिनिधी): – राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येऊन महा मेळावा घेणार आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे,या महासभेला निलंगा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार असल्याची माहिती जिजाऊसृष्टी येथे आज पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वाभिमानी लढा उभारला आहे. त्यांनी नुकताच सुरू केलेल्या दौऱ्याला लाखोंचा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्वासनाला १४ ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण होत आहे. आणखी दहा दिवसांची मुदत शिल्लक रहाणार आहे. त्या दहा दिवसात सरकारने कामाची गती वाढवावी यासाठी हे मराठा वादळ शांततेच्या मार्गाने धडकणार आहे.या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.