• Wed. Apr 30th, 2025

जगातील युनिक भूकंप संशोधन केंद्र कऱ्हाडला बनवणार : केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू

Byjantaadmin

Oct 7, 2023

भूकंप संशोधन केंद्राने भूगर्भात तीन किलोमीटर खोल बोअर मारून केलेल्या संशोधनातून भूकंपासह भूगर्भातील अनेक नवीन घडामोडी कशा घडत आहेत हे समोर आले आहे. हे संशोधन देशासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे विदेशातील संशोधकही येथे अभ्यासासाठी येत आहेत. हे सेंटर देशातीलच नव्हे तर जगातील युनिक सेंटर बनवणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हजारमाची (ता. कऱ्हाड)येथील भूकंप संशोधन केंद्रास भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी तेथे झालेल्या संशोधनाची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील भूविज्ञान व भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निलॉय खरे, भूकंप संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुकांता रॉय यांच्याकडून घेतली.

मंत्री रिजीजू म्हणाले, भूकंप संशोधन केंद्रातील संशोधक आणि एक्सपर्टस यांनी चांगले काम केले आहे. अजूनही पाच ते सहा हजार मीटर खोलीपर्यंत भूगर्भात जाण्याची तयारी या सेंटरने केली आहे. आत्तापर्यंत आमच्या संशोधकांनी जे संशोधन केले आहे, त्यामध्ये भूगर्भातील अनेक नवीन हालचाली समोर आल्या आहेत.त्यातून भूकंपाची माहिती समोर येण्यास मदत होत आहे. हे भूकंप संशोधन केंद्र हे युनिक सेंटर असून, देशात कोठेही असे सेंटर नाही. पृथ्वीच्या भूगर्भात काय चालले आहे, याचे संशोधन याच माध्यमातून करता येणे शक्य आहे. हे संशोधन देशासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचे आहे. विदेशातील संशोधकही येथे अभ्यासासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांनी येथे येऊन हे संशोधन बघायला पाहिजे.ते म्हणाले, कोयनानगर परिसरात जमिनीत तीन किलोमीटर खोल बोअर मारण्यात आली आहे. त्याद्वारे संशोधन सुरू करण्यात आले आहे. या संशोधनाबद्दल मी खूप समाधानी आहे. तीन किलोमीटर भूगर्भात जाणे हे खूप मोठे काम आहे. मात्र, त्यावरच न थांबता यापुढे पाच, सात किलोमीटर टप्प्याटप्प्याने खोल बोअर मारून त्याद्वारे भूगर्भातील संशोधन केले जाईल.

त्यातून भूकंपाच्या दरम्यान भूगर्भात होणाऱ्या हालचाली कशा होतात, याची माहिती पुढे येऊन त्याचा अंदाज देण्यास ते उपयुक्त होणार आहे. भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जात आहे. जेवढे आवकाशात संशोधन केले जात आहेत. त्यात पृथ्वी विज्ञानामध्येही भारत या संशोधनाच्या माध्यमातून पुढे जाईल. पृथ्वीच्या भूगर्भात काय हालचाली होतात, याची माहिती आपल्याकडे नसेल तर खूप अडचणी निर्माण होतील.आत्तापर्यंत भूगर्भातील हालचालीची माहिती खूप कमी मिळाली आहे. मात्र, या संशोधन केंद्रामुळे भूगर्भात खोलवर जाऊन तेथील खडक काढला जाईल. त्यावेळी त्याचा संशोधनात्मक अभ्यास चांगला होणार आहे. या संशोधन केंद्राने केलेले काम हे रेकॉर्डेड आहे. विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल म्हणून येथे येऊन वेगवेगळे खडक, त्याचे वयोवमान व अन्य माहिती घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *