• Wed. Apr 30th, 2025

नाना पटोलेंना काँग्रेस श्रेष्ठींचा धक्का; तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीसाठी दिलेली नावे नाकारली

Byjantaadmin

Oct 7, 2023

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नाहीत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत दिलेली नावे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी न घेता नाना पटोले यांनी नाव दिल्याची सूत्रांची माहीती दिली आहे. नाना पटोले यांनी कळवलेली यादी अंतिम नसल्याचे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पटोले यांनी दिलेल्या यादीवर केंद्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले नसल्याचे कळवले आहे.

नाना पटोले यांना धक्का
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे जागा वाटपाचा प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे तीन नेते समन्वय समितीमध्ये घेण्यात आले आहेत. नाना पटोले यांनी दिलेली नावे नाकारली गेल्याचे वृत्त असल्याने नाना पटोले यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान यांची नावे

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख या नेत्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान यांची नावे देण्यात आली होती. तशी यादी देखील माध्यमांमध्ये झळकली होती. मात्र, आता काँग्रेसमधील अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसच्या सदस्यांची नावे बदलली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *