जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजपकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडून राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात नही सहेगा राजस्थान ही मोहीम राबवली जात आहे. या अभियानातील अनेक बॅनर्स रस्त्यांवर लावण्यात आले होते. या बॅनरमधील एक बॅनर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारा बॅनर लावला होता. यासाठी ज्या शेतकऱ्याचा बॅनर लावण्यात आला होता. त्या शेतकऱ्यानं पोलखोल केली आहे.
राजस्थान भाजपनं १९ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव झाल्याचा दावा करत एक बॅनर लावला होता. त्या बॅनरवरुन वाद पेटला आहे. या बॅनरवर ज्या शेतकऱ्याचा फोटो लावण्यात आला होता. त्या शेतकऱ्यानं या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. माझ्यावर कसलंही कर्ज नसून माझ्या जमिनीचा लिलाव झाला नसल्याचं म्हटलं. माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरला गेल्याचं तो शेतकरी म्हणाला. मधुराम जयपाल असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे.
भाजपनं नही सहेगा राजस्थान या अभियानांतर्गत विविध ठिकाणी बॅनर लावले होते. त्यापैकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लावलेलं बॅनर वादात अडकलं आहे. १९ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव झाला हे राजस्थान सहन करणार नाही, असं भाजपनं म्हटलं होतं. त्या बॅनरवर ज्या शेतकऱ्याचा फोटो लावला होता. त्याचं नाव मधुराम जयपाल होतं. मधुराम जयपाल यांचं वय ७० वर्ष असून ते जैसलमेरच्या रामदेवरा येथील रिंखियोंकी ढाणी येथील आहेत. आपले फोटो बॅनरवर लागलेत हे देखील त्यांना माहिती नव्हतं.मधुराम जयपाल यांना या बॅनरबाबत माहिती नव्हती. त्यांच्या गावातील एका युवकानं हे बॅनर जयपूरमध्ये पाहिले. त्यानं त्याचा फोटो काढून गावातील व्हाटस्अप ग्रुपवर पाठवला. यामुळं मधुराम जयपाल यांच्या मुलाला ही गोष्ट समजली.
मधुराम म्हणतात माझ्यावर कर्ज नाही…
बॅनरवरील फोटो पाहून मधुराम जयपाल यांच्या मुलाला धक्का बसला. मधुराम यांनी यानंतर माहिती देताना म्हटलं की माझ्या कोणत्याही जमिनीचा लिलाव झालेला नाही. माझ्यावर कसलंही कर्ज नाही, भाजपनं माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरुन विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोणत्याही भाजपच्या व्यक्तींना ओळखत नाही. मी कसलंही कर्ज काढलेलं नाही. किसान क्रेडिट कार्ड घेतलं आहे, असं मधुराम जयपाल म्हणाले.मी कसलंही कर्ज काढलेलं नाही तरी माझा फोटो कसा काय छापला. माझ्याकडे ८० एकर जमीन असून कसलंही कर्ज घेतलेलं नाही, असं मधुराम जयपाल म्हणाले. भाजपनं फोटो वापरल्यासंदर्भात मधुराम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मधुराम यांनी या प्रकरणी स्थानिक भाजप नेत्यांसमोर नाराजी व्यक्त केली. भाजप नेत्यांनी हे फोटो राज्य पातळीवर लागले आहेत, असं म्हणत हात झटकले आहेत.
फोटो कसा काढला मधुराम म्हणतात
दोन महिन्यांपूर्वी काही लोकं नुकसान झालेल्या पिकांचा फोटो काढण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे मोठमोठे कॅमेरे होते. त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी फोटो काढले होते, असं मधुराम जयपाल म्हणाले. भाजपनं लावलेल्या बॅनरमुळं बदनामी होत असल्याचं ते म्हणाले.भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष खासदार भगिरथ चौधरी यांनी या शेतकऱ्याचा फोटो चुकून वापरला गेला असेल, त्याबाबत माहिती नसून दुरुस्ती केली जाईल, असं म्हटलं.