पुणे: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली असून शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरातून मान्सून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दुपारी जाहीर केले.मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सध्या अनुकूल वातावरण असल्याने गेल्या दोन दिवसात मान्सूनने महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून माघार घेतली आहे. परतीच्या मार्गाची नकाशावरील रेखा सटना, नागपूर, पुणे, मुंबई आणि अलिबाग या मार्गावरून जाते आहे.
पुढील दोन दिवस दक्षिण महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात तीन चार दिवस हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.पुढील काही दिवस राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असून ढगाळ हवामान गेल्यानंतर कमाल तापमान हळूहळू वाढणार, रात्रीचे तापमान हळूहळू कमी म्हणजेच थंडी जाणवणार आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण राज्यातून मान्सून बाहेर पडेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरण एकदम बदलले असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर रात्री गारवा जाणवतो आहे. शहरात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे धुके पसरले होते. दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन आकाश मुख्यत: निरभ्र आणि हवामान कोरडे राहणार आहे. संध्याकाळी अशंत: ढगाळ राहण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांतून पूर्णपणे मान्सून परतला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधूल मान्सून परतणं सुरु आहे.दरम्यान, पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातून पूर्णपणे मान्सून परतू शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होऊ शकतो आणि तापमान देखील सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.