• Wed. Apr 30th, 2025

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

Byjantaadmin

Oct 6, 2023

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

मुंबई,दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे:

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed