• Wed. Apr 30th, 2025

पेट्रोल पंपावरच्या टँकमध्ये पाईप टाकला, तिथून लाखोंचं डिझेल चोरलं…

Byjantaadmin

Oct 6, 2023

हिंगोली: जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात‌ असलेल्या बोल्डा येथील पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली आहे. डिझेल चेंबरमध्ये पाईप टाकून सुमारे अडीचशे फूटी पाईपच्या साह्याने विद्युत मोटारीने डिझेलची चोरी केल्याची धक्कादायक घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. चोरट्यांनी सव्वा चार लाख रुपये किमतीचे जवळपास चार हजार लिटर डिझेल पळविले आहे. हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील राष्ट्रीय बोल्डा उमरा मार्गावर असलेल्या राजर्षी शाहू महाराज या पेट्रोल पंपावर २९ऑगस्टला रात्रीच्या सुमारास येथील दोन कर्मचारी झोपले होते. तेव्हाच या ठिकाणी चोरट्यांनी डिझेल साठवण्यात आलेल्या डिझेल चेंबरचे कुलपाचे लॉक तोडून सुमारे ४५०६ लिटर डिझेल चोरी केले. याची किंमत सुमारे चार लाख पंधरा हजार रुपये होती. ही घटना सकाळी कर्मचारी जागे झाल्यानंतर समोर आली. तेथील कर्मचाऱ्यांच्या डिझेल साठवणूक केलेल्या चेंबरचे लोक तुटलेले निदर्शनास आल्याने डिझेलची चोरी झाली असल्याची माहिती त्यांनी मालकास दिली

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागरे यांच्या पथकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. यावर सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता डिझेल चोरून नेणारी वाहने यात एक बोलेरो जीप आणि दोन ट्रकचा वापर केला असल्याचे निदर्शनास आले.यावरून पोलिसांनी परिसरातील असलेल्या कुरुंदा, कामठा आदी ठिकाणी तपासणी केली. मात्र हि वाहने या मार्गाने गेली नसल्याचे स्पष्ट झाले.
यामध्ये फिर्यादी पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक किसन विणकर यांच्या दिनांक ०५ ऑक्टोंबर रोजी त्यांचे फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर नागरे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed