• Wed. Apr 30th, 2025

आप खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक

Byjantaadmin

Oct 4, 2023

नवी दिल्ली:-अंमलबजावणी संचालनालयाने आज (४ सप्टेंबर) सकाळी ७ च्या सुमारास आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर सलग १० तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. सिंह यांच्या घरातून आणि कार्यालयातून काही कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ईडी सध्या मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. याप्रकरणी ईडीने अलिकडेच आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रात खासदार संजय सिंह याचंही नाव आहे.

चौकशीनंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली आहे. चौकशी सुरू असताना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संजय सिंह यांच्या घराबाहेर जमू लागले होते. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतर सिंह यांच्या घराच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आलं. पोलीस आणि निमलष्करी दलाच्या सहाय्याने ईडीने संजय सिंह यांना अटक केली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संजय सिंह यांच्या नावाचा ईडीनं आपल्या तक्रारपत्रात समावेश केला होता. मद्य घोटाळ्याप्रकरणी केलेल्या चौकशीत व्यावसायिक दिनेश अरोरा यांनी दिलेल्या जाबाबात संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आल्यानंतर ईडीनं त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली होती. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, “दिनेश अरोरा आधी संजय सिंह यांना भेटले. त्यांच्या माध्यमातून एका पार्टीत ते मनीष सिसोदिया यांना भेटले. सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे अरोरा यांनी सिसोदिया यांना पार्टी फंड म्हणून ८२ लाख रुपयांचे धनादेश दिले. अरोरा सिसोदियांशी ५ ते ६ वेळा बोलले. तसेच, ते संजय सिंह यांच्याबरोबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरीही गेले होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed