• Tue. Apr 29th, 2025

प्रणिती शिंदेंच्या लोकसभा उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार; सुशीलकुमार शिंदेंनी घेतलं मनावर

Byjantaadmin

Oct 3, 2023

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी, अशी जनतेची इच्छा आहे. असं मी हायकमांडशी बोलणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, प्रणिती शिंदे यांचं नाव सुचवून आपण निवडणूक न लढविण्यावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी दाखवून दिलं आहे. माजी मुख्यमंत्री SUSHILKUMAR SHINDE यांच्या मुंबईतील घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी PRANITI SHINDE यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत आपण हायकमांडशी बोलणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले की,SOLAPUR LOKSABHA साठी आमदार प्रणिती शिंदे या योग्य उमेदवार आहेत. त्यांची वैचारिक भूमिका ठोस असून, सर्वधर्मसमभावाची भूमिका घेऊन त्या वाटचाल करीत आहेत. गरिबांसाठी त्या रात्रंदिवस काम करीत आहेत. सोलापुरात आतापर्यंत त्यांनी जे काम केले आहे, ते सर्वांना परिचित आहे. त्यांचे हिंदी आणि मराठीवर प्रभुत्व आहे. शिक्षणही इंग्रजी माध्यमांमध्ये झालेले आहे. प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणाबाबत चांगली समज आहे. संसदेत पॉवरफुल पद्धतीने आपली भूमिका मांडण्याची योग्यता प्रणिती शिंदे यांच्यामध्ये नक्कीच आहे, त्यामुळे मी प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षांपासून आमदार प्रणिती शिंदे या स्वतः दादरहून गणपती आणत आहेत. पूर्वी मी स्वतः आणत होतो. आता मी वयाच्या ८३ व्या वर्षात पोचलो आहे. आता मी दरवाजात स्वागत करतो आणि घरात आणून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करतो.महिला आरक्षणाचा विषय ही काही नवीन बाब नाही. काँग्रेसने ११ ते १२ वर्षांपूर्वी राज्यसभेत हे विधेयक पास केलेले आहे. लोकसभेत यायचे राहिले होते, आता भाजपने ते लोकसभेत आणले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. महिला सक्षम होऊन त्यांनी पुरुषांबरोबर काम केलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.या देशात प्रजासत्ताक राहिले पाहिजे. सर्वधर्मसमभाव टिकला पाहिजे. लोकशाही चिरंतन राहिली पाहिजे. गरिबांची सेवा करणं हे आम्हा राजकारण्याचं कर्तव्य आहे. मी गणपतीला प्रार्थना करतो की, कालपर्यंत जे झालं ते झालं. पण, आतापासून तरी सर्वधर्मसमभाव निभावण्याची सद्बुद्धी सर्वांना द्यावी, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed