ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये झालेले मृत्यू हे नैसर्गिक नसून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार निष्पाप रुग्णांचे खुनी आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुळे मंगळवारी (ता. ३) अमरावतीत दाखल झाल्या. अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. या तुटवड्याचे खापर हाफकिनवर फोडले जात आहे. मुळात या सर्व प्रकाराला हाफकिन जबाबदार नसून राज्य सरकार व आरोग्य विभाग कारणीभूत असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली.
CM SHINDE यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांचे हात रुग्णांच्या खुनाने रंगले आहेत, असे त्या म्हणाल्या. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे.SARKAR मनुष्यबळ देत नसेल, तर अशा प्रकाराला हाफकिन जबाबदार आहे, असं कसं म्हणता येईल, असा सवालही त्यांनी केला. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार केवळ आपला खिसा भरण्यात व्यस्त आहे. निष्पाप रुग्णांचे बळी जात असल्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही, असेMP SULE यांनी सांगितले.
कोविड काळामध्ये महाराष्ट्रात भीषण परिस्थिती होती. सर्वत्र हाहाकार उडाला होता. अशा परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आरोग्य विभाग अत्यंत जबाबदारीने सांभाळला. आता राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य आहे. सरकार चालवायला तीन-तीन इंजिन लावले आहेत. तरीही यांना राज्यातील आरोग्य यंत्रणा सांभाळता येत नाही, अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.ठाणे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. या घटनेसंदर्भात सरकारने रुग्णांच्या नातेवाइकांची बिनशर्त माफी मागावी. त्यांना योग्य ती मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात ‘एक न धड भाराभर चिंध्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. मुळात असंवैधानिक पद्धतीने सत्तेवर आलेल्या या नेत्यांना राज्य कारभार सांभाळत नसेल तर त्यांनी खुर्च्या रिकाम्या कराव्यात, पण असे रुग्णांचे बळी घेऊ नयेत, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.