MUMBAI-राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत जितके वादग्रस्त तितकेच कामाच्या बाबतीत डॅशिंग म्हणून ओळखले जातात. एखादा प्रश्न समोर आला तर तो तत्काळ सोडवून `एक घाव दोन तुकडे`, असा त्यांचा प्रयत्न असतो. निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर मतदारसंघातील एक प्रश्न घेऊन आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडे गेले होते.
मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट झाल्यानंतर आमदार संभाजी पाटील निलंगेकर त्यांच्याकडे एक मागणी केली आणि सावंतांनी फायलींवर सह्या करता करताच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगितले. फोन लावल्यानंतर चोवीस तासांच्या आत माझ्याकडे प्रस्ताव येऊन त्यावर स्वाक्षरी झाली पाहिजे, असे आदेश देत फोन ठेवला.आरोग्यमंत्र्यांचा हा रुबाब पाहून निलंगेकरही अवाक् झाले.
त्याचे झाले असे की, औराद शहाजनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याकारणाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे बोरसुरी येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाकडे देण्यात आला होता. परंतु औराद (श.) येथील हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे.
यावर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांची मंत्रालयात नुकतीच भेट घेतली. निलंगेकर यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित होणे कसे आवश्यक आहे, हे मंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. यावर तातडीने कार्यवाही करत सावंतांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला. बोरसुरीचा प्रस्ताव चोवीस तासांत माझ्याकडे येऊन स्वाक्षरी करून गेला पाहिजे, असा आदेश देत सावंतांनी निलंगेकरांचा प्रश्न निकाली काढला.
यानिमित्ताने आरोग्यमंत्र्यांच्या `आॅन दी स्पाॅट अॅक्शन`चा कारभारही दिसून आला. सावंत हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे ज्या जिल्ह्याची जबाबदारी आहे, तिथे त्यांच्यावर विरोधकांकडून निधी वाटपात भेदभाव केल्याचे आरोपही झाले. पण सत्ताधारी पक्षातील आमदार निलंगेकर यांना मात्र सावंतांचा वेगळाच अनुभव आल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. निलंगेकर यांनी स्वतः हा अनुभव समाजमाध्यमावर व्हिडिओसह शेअर करत आपल्या मागणीवर तत्काळ कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.