लिंगायत महासंघाचे आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून देण्यात आले. यावेळी लातूरच्या जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण लागू करावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यामार्फत देण्याचे लिंगायत महासंघाने ठरविले होते. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून हे आरक्षणाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर, औसा सह सर्व तालुक्यातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना लिंगायत महासंघाच्यावतीने आरक्षण मिळण्यासंदर्भातचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात लिंगायतांना हिंदु लिंगायत, लिंगायत, वाणी या नावाने ओळखले जाते. 2014 साली वाणी, लिंगायत वाणी या नावाला ओबीसीचे आरक्षण मिळाले. मात्र याचा फायदा समाजातील अत्यल्प लोकांनाच झाला. वाणी नावाने आरक्षण लागू झाल्याने लिंगायत, हिंदु लिंगायत अशी कागदोपत्री जातीची नोंद असणार्या लाखो लिंगायत बांधव या आरक्षणापासून वंचित राहिले. महसुली पुरावे शोधून आरक्षण मिळविण्यासाठीही आम्ही प्रयत्न केला. मात्र तसे पुरावेच उपलब्ध नसल्याने तेथूनही पदरी काहीच पडले नाही. म्हणून लिंगायत महासंघाच्यावतीने प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी शासनाकडे सरसकट लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण लागू होण्यासाठी वाणी व लिंगायत हे एकच आहेत व वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लिंगायत नावाने जातीची नोंद असणार्या लोकांना लागू व्हावे यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे या मागणीचे निवेदन आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांच्यामार्फत देण्यात आले.
हे निवेदन जिल्हाधिकार्यांना देत असताना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, प्रा.वैजनाथ मलशेट्टे, प्रा.विठ्ठल आवाळे, विश्वनाथ मिटकरी, नागनाथप्पा भुरके, शिवदास लोहारे, सोमनाथ स्वामी, तानाजी पाटील भडीकर, उमाकांत कंटे, संतोष शेळके यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
लिंगायत महासंघाचे आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
