सबसे कातिल गौतमी पाटील नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या कार्यक्रमात राडा होता, कधी एक-दोघांचा मृत्यू होतो तर कधी तिचा कार्यक्रम कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही बनतो. आता गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या डान्सवर काहींचा आक्षेप असला तरी तिच्या कार्यक्रमांना आतापर्यंत तरी कोणी विरोध केलेला नाही. मात्र, आता चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणातच गौतमी पाटीलने आपल्या नृत्याचा जलवा दाखवल्याचे समोर आले आहे. ज्या शाळेच्या प्रांगणात मुले शिकतात, सुस्कांरी होतात, त्याच प्रांगणात गौतमी पाटीलने आपल्या अदांनी तरुणांची मने रिझवल्याचे वृत्त समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री असलेले दीपक केसरकरही चांगलेच संतापले आहेत.
सर्व गावकऱ्यांसाठी मोफत होता कार्यक्रम
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर संध्याकाळी गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम झाला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणीच दोन दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम झाला. त्यामुळे हा कार्यक्रम आता चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे.
शालेय शिक्षणमंत्र्यांची नाराजी
दरम्यान, गौतमी पाटीलच्या शाळेच्या नृत्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये असताना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता दीपक केसरकर म्हणाले, गौतमी पाटील हिला शाळेत कोणी नाचवले, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवले तो घरी जाईल. तसेच, ही शाळा वाईन कंपनीला दत्तक दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यावरही दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले.
शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी
दीपक केसरकर म्हणाले, शाळा वाईन कंपन्यांना कोणी दिली माहिती नाही. आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी आहे. मुळात एकाही शाळेचे खासगीकरण झालेलं नाही. अफवा कोण उठवते? माहिती नाही. मुळात जीआर सीएसआर मनीसंदर्भात आहे. सीएसआरचे पैसे NGO कडे जातात. एनजीओकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांपर्यंत हे पैसे अजिबात पोहोचत नाही. त्यामुळे मुलांच्या शाळेसाठी कंपन्यांकडून चांगल्या सुविधा निर्माण होत असतील आणि त्यासाठी पैसे येत असतील तर आक्षेप काय आहे?
गौतमी पाटीलच्या नावाने बदनामी
दीपक केसरकर म्हणाले, गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा अधिकार तुम्हाल कोणी दिला? असा संतप्त सवालही केसरकर यांनी विरोधकांना केला. गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रातील शाळांमध्ये राहिले पाहिजे का? याचा ही विचार केला पाहीजे, असे मंत्री केसरकर यांनी विरोधकांना सुनावले आहेत.