नीळकंठेश्वराचा आशीर्वाद घेऊन जलसाक्षरता अभियानास प्रारंभ गावोगावी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद
हजारो जलयोध्यांच रॅलीत सहभाग
निलंगा/प्रतिनिधी: ग्रामदैवत नीळकंठेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जलसाक्षरता अभियानास गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निलंगा येथून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी गावोगावच्या नागरिकांनी या अभियानास उस्फुर्त प्रतिसाद दिला.हजारो जलयोद्ध्यांसह त्या-त्या गावातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील नागरिकांना जलसाक्षर करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात येणाऱ्या या अभियानास मंगळवारी (दि.१९ )निलंगा येथून प्रारंभ झाला.सकाळी वृंदावन मंगल कार्यालयात सर्वांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ग्रामदैवत नीळकंठेश्वराचे दर्शन घेऊन अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी नीळकंठेश्वराची महाआरती करण्यात आली.यानंतर माकणी थोर येथे नवसाला पावणाऱ्या हनुमानाचे दर्शन व महाआरती करण्यात आली.जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा,नागरिकांना पिण्यासाठी व पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे,असे साकडे आ.निलंगेकर यांनी
हनुमंताला घातले.
उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की,पाणी हे जीवन आहे.पाण्याशिवाय जगणे शक्य नाही.यावर्षी आपल्या लातूर जिल्ह्यात अद्यापही पाऊस झालेला नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.उर्वरित काळात पाऊस झाला नाही तर भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.दुष्काळातील उपाययोजना करण्यासाठी आपण शासनाकडे मागणी केलेली आहे.तरीदेखील उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पावसाच्या माध्यमातून मिळणारे पाणी साठवून ठेवावे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आपण हे अभियान राबवत आहोत.शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरसह उस्मानाबाद व बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता शासनाने हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे,अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी संजय दोरवे व दगडू साळुंके यांनी प्रास्ताविक करून हे अभियान राबविण्यामागची भूमिका विषद केली.शेषराव ममाळे यांनी सूत्रसंचलन केले.पहिल्या दिवशी हलगरा,अंबुलगा,केळगांव,निटुरमो
पानचिंचोली,कोतल शिवणी,हाडगा या गावात ही रॅली पोहोचली.त्या गावातील उपस्थितांशी आ.निलंगेकर यांनी संवाद साधला.याप्रसंगी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
इच्छाशक्तीला हवी जनरेट्याची जोड …
यावेळी बोलताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले की,मराठवाड्याला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले.त्या काळात दुष्काळी स्थिती कायमची दूर करण्यासाठी उपाय योजना करण्याची मानसिकता त्या-त्या नेत्यांनी दाखवली परंतु काही नेत्यांच्या दबावामुळे ते शक्य झाले नाही. नेत्यांच्या इच्छाशक्तीला जनरेट्याची जोड मिळाली असती तर शासनाला त्याची दखल घ्यावी लागली असती.आता देखील शासनाने निर्णय घेतला आहे.त्याला जनरेट्याचे पाठबळ मिळावे म्हणूनच सरकारमध्ये असूनही आपण हे अभियान राबवित आहोत.शेती आणि उद्योगालाही पाणी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्स्फूर्त प्रतिसाद….
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या जलसाक्षरता अभियानास पहिल्याच दिवशी गावोगाव उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ढोल- ताशांचा गजर व हलगीच्या निनादात दुचाकी रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून रॅलीत सहभागी झालेल्या युवकांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.रॅलीमध्ये रथात स्थापन करण्यात आलेल्या गणपतीची गावात आल्यानंतर आरती करण्यात आली.त्यानंतर आ.निलंगेकर उपस्थितांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले.
हक्काच्या पाण्यासाठी पाठिंबापत्र….
ठिकठिकाणी गणेश मंडळाचे पदाधिकारी,ग्राम पंचायतचे प्रतिनिधी, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, महिला बचत गट,महिला मंडळ व भजनी मंडळाच्या सदस्यांनी हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत असा संकल्प करून आपली पाठिंबापत्रे आ.निलंगेकर यांच्याकडे सुपूर्द केली.