महाराष्ट्र महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
निलंगा- अन्याय अत्याचारी सत्तेच्या विरोधात, कुटुंबाचा विचार न करता लोकशाहीची स्थापना करण्यासाठी सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हे देशीवाशीयांचे कर्तव्य आहे. समाजातील लोकांचा या लढ्याबद्दलचा गैरसमज दूर करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. या उद्देशाने महाराष्ट्र महाविद्यालयात, निलंगा परिसरातील काही निवडक मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्थानिक समितीच्या” वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.नामदेवराव पाखरसांगवे , श्री.रामराव रंगराव पाटील, श्री.मधुकरराव पाटील, या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार तसेच कै.बाबुराव गायकवाड यांचा नातू बालाजी गायकवाड, कै.शंकरराव पाटील सरवडीकर यांच्या पत्नी श्रीमती कमलबाई, कै.नागनाथराव बुधे यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई,कै. सदाशिवराव सावरे यांच्या पत्नी श्रीमती सिनाबाई यांचाही याप्रसंगी प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या हस्ते शॉल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वा.सै. श्री.नामदेवराव पाखरसांगवे, स्वा.सै. श्री.रामराव रंगराव पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयाने सत्कार केल्याबद्दल समाधान व आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सीमा सुरक्षा दलाच्या बी.एस.एफ. व सी. आर. पी. एफ. मध्ये भरती झालेल्या महाविद्यालयातील बालकुंदे शंकर, किट्टेकर चैतन्य, रामदास गावलगडदे या विद्यार्थ्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. श्री बब्रूवानजी सरतापे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समितीचे” समन्वयक डॉ.भास्कर गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष बेंजलवार, तर आभार डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.ज्ञानेश्वर चौधरी, सहसमन्वयक डॉ. नरेश पिनमकर, डॉ. धनंजय जाधव, क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती.