महाराष्ट्र महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग व प्रमाणपत्र कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. मोडी लिपी ही साधारणतः १९७० पर्यंत महाराष्ट्रात प्रचलीत होती. महाराष्ट्राच्या प्रदेशात यादवांच्या काळापासून प्रचलीत असलेली मोडी लिपी शिवकाळात व पेशवाईत अधिक बहरली. पुढे इंग्रजांच्या काळातही मोडी लिपीचे अस्तित्व टिकून होते. स्वातंत्र्यानंतरही मोडी लिपी शालेय अभ्यासक्रमात होती. परंतु नंतर ती हळूहळू अभ्यासक्रमातून कमी करण्यात आली. त्यामुळे मोडी लिपीचा व्यवहारातील वापर कमी झाला. असे असले तरी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र तेलंगना परीसरातील अनेक जुने दस्ताऐवज हे मोडीतच आहेत. त्यामुळे आर्थिक व जमीनीविषयीच्या नोंदी तपासण्यासाठी मोडी लिपी समजुन घेणे आवश्यक आहे. याशिवाय ऐतिहासिक साधन तपासण्यासाठी मोडी लिपी माहीत असणे आवश्यक आहे. या भुमिकेतून या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
मोडी लिपी प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षक म्हणून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील पोस्ट डॉक्टरोल फेलो, डॉ. कामाजी डक हे उपस्थित होते. त्यांनी एक आठवड्यात मोडी लिपीचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले. ही लिपी सरावानेच आत्मसात केली जाऊ शकते म्हणून याचे सराव सत्र पुढील काळात आयोजित केले जाणार आहेत.
मोडी लिपीच्या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भुमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक मा. कृष्णा चावरे हे उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी भुमी अभिलेख विभागातील अनेक दस्ताऐवज वाचनासाठी मोडीच्या अभ्यासकांची आवश्यकता आहे. अशा प्रसंगी महाविद्यालयाने मोडी लिपीचे प्रशिक्षण आयोजित करुन अभिलेख विभागास मोलाची मदत केली असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे होते. त्यांनीही याप्रसंगी मोडी लिपी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध असल्याचे मत प्रतीपादन करुन त्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोडी लिपीचा अधिकाधिक सराव करावा असे मत प्रतीपादन केले.
मोडी लिपी प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक, भुमी अभिलेख विभागातील व तहसील कार्यालयातील कर्मचारीही प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभासाठी आयक्युएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, सहसमन्वयक डॉ. नरेश पिनमकर, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. चंद्रकुमार कदम, डॉ. हंसराज भोसले, ग्रंथपाल मिनाक्षी बोंडगे, प्रा. शिवरुद्र बदनाळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय पवार यांनी केले तर आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुभाष बेंजलवार, प्रा. दत्ता बेंजलवार, प्रा. अनुराधा महाजन, श्री सिद्धेश्वर कुंभार,सचीन महेंद्रकर इत्यादिंनी परीश्रम घेतले.